जावळी येथील तालुकास्तरीय मेळाव्यात विरोधकांवर घाणाघात
पांचगणी : शिक्षक बँकेचा वापर विद्यमान चेअरमन यांनी खाजगी मालमतेसारखा चालवला आहे. बँकेत सत्ताधारी असणारे फसवे कामकाज करीत असून सभासदांनी सजग राहिले पाहिजे. याकरीता होऊ घातलेल्या बँक निवडणुकीत त्यांना जागा दाखवण्याची गरज असून बँकेत परिवर्तन करीत एकहाती शिक्षक समितीची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. असे मत राज्यध्यक्ष उदय शिंदे यांनी व्यक्त केले.
आगामी प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्टेवाडी, ता. जावळी येथे शिक्षक समितीचा तालुकास्तरीय मेळावा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी शांताराम ओंबळे, मंगल पिसाळ, नितीन जाधव यांचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच सुरेशजी पार्टे यांना वाढदिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमास शिक्षक समितीचे राज्यध्यक्ष उदय शिंदे, शिक्षक पतसंस्था चेअरमन धिरेश गोळे, सातारा जिल्हा प्रभारी अध्यक्ष अध्यक्ष प्रदीप कदम, उपाध्यक्ष संजय नांगरे, कोषाध्यक्ष विठ्ठल फडतरे, माजी अध्यक्ष शंकर देवरे, कराड पाटण सोसायटी चेअरमन आनंदराव थोरात, संचालक किरण यादव, सुभाष शेवाळे, चंद्रकांत मोरे, नितीन शिर्के, अनिल चव्हाण, अरुण पाटील, अनिल पिसाळ, जावळी तालुका अध्यक्ष सुरेश चिकणे, सरचिटणीस तानाजी आगुंडे, कार्याध्यक्ष विजय बांदल, अनिल दरेकर, ज्ञानेश्वर शिर्के, सुनील शिंदे, सुरेश शेलार, शामराव जुनगरे, संपत शेलार, विनायक चोरट, मदन बोराटे, महादेव निकम, नितीन जाधव, महेश पालकर आदी कार्यकारणी, महिला अध्यक्षा मनीषा वाडकर, सरचिटणीस स्वाती बारटक्के आदी समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शिंदे पुढे म्हणाले, संघटन, संघटना माध्यमातून बँक असा हा कार्यक्रम होत आहे. शिक्षक समितीची भूमिका अन्यायासाठी लढणे, न्यायाची चाड अशी असून तालुक्यातील समितीची ताकद वाढत आहे. पदापेक्षा कामाला प्राधान्य देणारा समितीचा कार्यकर्ता असून अशा विचारांची गरज आहे. आपण चांगल्या विचारप्रवाहत काम करत असून अन्यायकारक प्रश्नांना न्याय देण्याचे काम करणारी नैतिकदृष्ट्या विचारधारा असणारी शिक्षक समिती ही सर्वात मोठे संघटन आहे. आपल्या प्रश्नासाठी संघटित होणे ही काळाची गरज आहे.
किरण यादव म्हणाले, शिक्षक बँकेची पाच वर्षातील भ्रष्ट प्रणाली उध्वस्त करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आता संघाच्या हातातील बँक हातात घेण्याची वेळ आली आहे. त्याकरिता जागृत सदस्यांनी आता विद्यमान चेअरमन यांस घरी बसवून त्याची जागा त्यांस दाखवली पाहिजे असे स्पष्ट मत शिक्षक विद्यमान संचालक किरण यादव यांनी व्यक्त केले.
सुरेश चिकणे यांनी प्रास्ताविक केले.नितीन मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. जावळी तालुका शिक्षक समिती मेळाव्यात राज्यध्यक्ष उदय शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
होऊ घातलेल्या जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीच्या निमीत्ताने मेळाव्यांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती सुरू झाली आहे. संघ समिती यांच्यात आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी नजीकच्या काळात पहावयास मिळणार आहे. बँकेचे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कलगीतुरा चांगलाच रंगणार असून बँकेच्या कारभाराचा सत्य लेखाजोखा यानिमित्ताने सभासदांच्या समोर येणार आहे.