पाटण : पाटण नगरपंचायतीमधील नगरसेवकांच्याकडून गेल्या पाच वर्षात झालेल्या विकास कामांबाबतचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी यांना जनतेच्यावतीने वादविवाद चर्चेसाठी समोरासमोर यावे. जागा आणि वेळही दहा दिवसात आपण ठरवावी.
पत्रकाद्वारे म्हटले आहे की, पाटण ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर पाटण शहराचा सर्वांगीण विकास होईल असे वाटले होते. मात्र पाच वर्षाच्या कालावधीत पाटण शहराचा म्हणावा तेवढा विकास झालेला दिसत नाही. अगदी शेवटच्या टप्प्यात रस्त्यांची कामे झाली तीही निकृष्ठ दर्जाची झाली आहेत. काही ठिकाणी गटरची कामे झाली तीही अर्धवटच. स्वच्छतेबाबतही शहरवासियांमधून नाराजी आहे. अनेक ठिकाणी कचरा तसाच पडून असतो. स्मशानभूमी, नगरपंचायत इमारत, मटण मार्केट, मच्छी मार्केट या इमारतींचे कामेही रखडली आहेत. केवळ पाच वर्षात महिला व पुरूष नगरसेवकांमध्ये दोन गट निर्माण होवून एकमेकांबद्दल आरोप, प्रत्यारोपच जास्त झाल्याने पाटण नगरपंचायत सातत्याने चर्चेत राहिली आहे. पाटण शहराचा पाण्याचा प्रश्नही बिकट बनला असून फिल्ट्रेशन असूनही पाणी लोकांना गढूळच प्यावे लागले. गेल्या एका महिन्यापासून पाणी वेळेवत येत नसून सणासुदीच्या काळातही लोकांना पाण्याची वाट पहावी लागत आहे. पाटणमधील नागरीकांनी याबाबतच्या आपल्याकडे सातत्याने तक्रारी केल्या आहेत.
त्यामुळे पाटण शहरातील विकासकामांबाबत पाटण शहरवासिय पूर्णपणे नाराज असून नगराध्यक्ष, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी सामान्य जनतेचे प्रश्न आणि आपला पाच वर्षाचा कारभार, अहवाल जनतेसमोर मांडावा. असे सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे, पत्रकावर नितीन पिसाळ यांची सही आहे.