कराड : भारतात दरवर्षी हजारो लोक रस्ते अपघातात आपला जीव गमावतात. रस्ते अपघात कमी करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो त्याअंतर्गत सर्वसामान्यांना वाहतुकीशी संबंधित नियमांची माहिती दिली जाते. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करीत असल्याची माहिती कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड कंपनीचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी नितेश जनबंधू यांनी दिली.
कृष्णा कॅनॉल येथे ३३ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे महत्व नागरिकांना व वाहन चालक यांना सांगण्यात आले. आणि जनजागृती करण्यात आली. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक सरोजिनी पाटील, कॉन्स्टेबल सोनम पाटील, कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड कंपनीचे जनरल मॅनेजर प्रभात कुमार झा, कंपनीचे व्यवस्थापक विलास देसाई, वरिष्ठ सुरक्षा अधिकारी, नितेश जनबंधू, सुरक्षा अधिकारी शितल ठिगळे आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड कंपनीचे जनरल मॅनेजर प्रभात कुमार झा म्हणाले, इंटरनॅशनल रोड ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, जगभरात दरवर्षी 12.5 लाख लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. यामध्ये भारताचा वाटा 10 टक्क्यांहून अधिक आहे. ५९.६ टक्के रस्ते अपघात हे वाहनांच्या वेगामुळे होतात. सर्व अपघात दारू, ड्रग्सचा वापर, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, वाहनांची जास्त गर्दी, कायदेशीर वेगापेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणे आणि थकवा इत्यादी कारणांमुळे होतात.