देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माण – खटावचे भूमिपुत्र आ. जयकुमार गोरेंची पाणीप्रश्न आणि भागाच्या विकासाबातची तळमळ तन्मयतेने ऐकली. आ. गोरेंनी अगदी मुद्देसुद मांडणी केली आणि पंतप्रधानांनी सकारात्मकता दाखवली. त्यांनी खटावला येण्याचे निमंत्रण स्विकारले.जयाभाऊंच्या विरोधात कारस्थाने करणाऱ्या आणि सवतीची जिरवण्यासाठी नवऱ्याला मारणाऱ्या प्रवृत्ती हद्दपार करा असे आवाहन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
दिवड येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि माण तालुक्यातील भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यानंतर आयोजित गोंदवले गटाच्या जाहीर सभेत ते बोलत होते.
कार्यक्रमाला आ. जयकुमार गोरे, जेष्ठ नेते अर्जुनतात्या काळे, जि. प. सदस्य अरुण गोरे, सभापती विलासराव देशमुख, रंजना जगदाळे, सरपंच जाकीर सय्यद, उपसरपंच किरण सावंत, डॉ. मासाळ, अकिल काझी, विष्णूपंत कट्टे, गुलाबराव कट्टे, दिगंबर राजगे, आणि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना आ. जयकुमार गोरे म्हणाले, माझ्या मतदारसंघातील पाण्याचा थेंब मी कुणाला पळवू दिला नाही. इथली एमआयडीसी मंजूर करायला आम्ही प्रयत्न केलेत. त्यामुळे पळवापळवीची भाषा कुणी करु नये. आमचा मतदारसंघात रेल्वे आणायचा प्रयत्न सुरु आहे. मला पाणी आणायची, विकासकामे करायची मस्ती आहे. आता विरोधकांची पोकळ मस्ती उतरविण्याचा अजेंडा राबविणार आहे. मी मतदारसंघाचा कायापालट करणाऱ्या तीन ओळींचा संकल्प घेऊन राजकारणात आलो होतो. तो संकल्प पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटलो. माझ्या अगोदर या तालुक्याने चुकीचे पुढारी पोसले होते. जनतेने माझ्या विरोधकांना दूध पाजले मात्र त्यांनी कायमच विष ओकले. पाण्याच्या टॅंकरची मागणी करणारी जनता आता ऊस तोडीसाठी टोळी मागताना दिसत आहे. हा बदल मी केलेल्या कामांची पोहचपावती आहे. उरमोडीचे पाणी शेताच्या बांधापर्यंत देण्यासाठी १४३ कोटींची कामे सुरु आहेत. जिहेकठापूरचे पाणी आणून पुन्हा एकदा फेटा बांधायची वेळ जवळ आली आहे. पवारांनी सांगितले कि जयकुमारला अडवायला प्रत्येक वेळी फौज येते. त्यांना प्रत्येक वेळी पाणी पाजलय. यापुढे कुणाच्यात किती किती हिम्मत आहे तेच बघणार आहे. वाळूवाल्यांनी जरा सबूरीने घ्यावे अन्यथा त्यांच्याकडेही बघावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला.
कार्यक्रमात नूतन सभापती आणि तालुकाभर चर्चा झालेल्या दिवडच्या सरपंचांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादीतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ॲड. हांगे,सदाशिव सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रास्ताविक सयाजी लोखंडे यांनी केले.
फोटो ओळी
दिवड (ता माण )येथे भाजप पदाधिकारी मेळावा संपन्न यावेळी खा रणजितसिंह निंबाळकर व आ जयकुमार गोरे