स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या फसवणुकीच्या तक्रारीवरुन फलटण पोलिसांनी दिगंबर आगवणे याला अटक करुन त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर आता आगवणेच्या अडचणीत आणखीन वाढ झाली असून दुसऱ्या एका आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याला फलटण पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयासमोर उभे केले असता पुन्हा 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याने आगवणेचा पाय आणखीन खोलात गेला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्वराज्य नागरी पतसंस्थेच्या फसवणूकप्रकरणी अटकेत असलेल्या दिगंबर आगवणे याचा जामिनासाठीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला असून आता आगवणे याच्या आयुर ट्रेडिंग कंपनीसंदर्भात दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने दि. 19 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. याबाबत आयमत गनिम शेख (रा. लक्ष्मीनगर, फलटण) यांनी दिगंबर रोहिदास आगवणे याच्या विरुध्द तक्रार दिली आहे.
तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, 2016 साली आयमत गनिम शेखर व त्यांचा भाऊ अमीर गनिम शेख या दोघांना दिगंबर आगवणे याने त्याच्या आयुर ट्रेडिंग कंपनीत 1 कोटी रुपये गुंतवणूक केल्यास दरमहा दोन लाख रुपये परतावा देतो, चांगला फायदा होईल, मी तुम्हाला कंपनीत भागीदार करुन घेतो, असे अमिष दाखवले. त्यावेळी शेख यांनी आमच्याकडे 10 लाख रुपये असल्याचे सांगितले. त्यावर आगवणे त्याचा मित्र विनोद धुमाळ हा तुम्हाला कर्ज काढून देण्यास मदत करेल. तुमच्या घरावर बँक ऑफ पटियाला येथून 45 लाख रुपयांचे कर्ज मंजूर होईल. त्या बदल्यात धुमाळ याला 5 लाख रुपये कमीशन द्यावे लागेल असे सांगितले.
त्यावर शेख कुटुंबियांनी धुमाळ यांनी बँक मॅनेजरची भेट घडवून आणली. आमच्या घराची कागदपत्रे अपूर्ण असताना आगवणे व धुमाळ यांनी बनावट कागदपत्रे तयार करुन शेख यांच्या नावावर कर्ज प्रकरण करुन आईवडिलांना जामीनदार करुन घेतले. पहिल्यांदा 25 लाखांचे कर्ज प्रकरण केले व त्यानंतर 15 लाख रुपयांचे कर्ज प्रकरणे मंजूर करुन घेतली. शेख कुटंबियांनी त्यांच्याकडील 10 लाख रुपये, कोळकीतील हेमंत जगताप यांच्याकडून 29 लाख रुपये कर्ज, झिरपवाडीतील जमिनीपोटी ॲडव्हॉन्स मिळालेले 15 लाख रुपये असे 54 लाख रुपये दिगंबर आगवणे याला दिले. अशा प्रकारे बँकांचे कर्ज व घरातील रक्कम असे मिळून दिगंबर आगवणे याला शेख कुटुंबियांनी 95 लाख रुपये आयुर कंपनीत भागीदार करुन घेतो म्हणून दिलेले आहेत. आणखीन भांडवल लागणार म्हणून आगवणे याने अभ्युदय बँक पुणेचे कर्ज प्रकरण केले असून त्याला शेख यांना जामीनदार करुन घेतले आहे.
त्यानंतर परतावा येत नसल्याने शेख आगवणे याच्याकडे पैसे मागू लागले असता त्याने 95 लाख रुपयांपैकी फक्त 7 लाख रुपये परत दिले. त्यानंतर लवकरच आपले मोठे काम होणार आहे. तुमचे पैसे परत मिळतील असे 2016 सालापासून आगवणे शेख कुटुंबियांना सांगत होता. मात्र, 2020 साल उजाडले तरी देखील आगवणे याने 88 लाख रुपयांपैकी काहीच पैसे दिले नसल्याची शेख यांची तक्रार असून याबाबत त्यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात रोहिदास दिगंबर आगवणे रा. गिरवी, ता. फलटण याच्याविरुध्द तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात आगवणे याला अटक केली असून न्यायालयाने दि. 19 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.