वाई : महाराष्ट्रात सुप्रसिद्ध बावधन गावची बगाड यात्रेचा नावलौकिक आहे. यंदाचा बगाड घेण्याचा बहुमान शेलारवाडी तालुका वाई येथील बाळासाहेब हनुमंत मांढरे यांना मिळाला आहे. त्यामुळे शेलार वाडीत उत्साहाचे आनंदाचे वातावरण आहे.बगाड्या बाळासाहेब मांढरे यांनी थोरली बहीण सुवर्णा बाळकृष्ण मोरे राहणार मोरेवाडी तालुका जावली हिला मुलगा व्हावा म्हणून 2001 ला नवस केला होता. बहिण सुवर्णा हिला पाच मुली होत्या. मुलगा नव्हता म्हणून धाकटा भाऊ बाळासाहेब मांढरे यांनी नवस केला होता. नवस केल्यावर दुसऱ्याच वर्षी बहिणीला मुलगा झाला म्हणून नवसपूर्तीसाठी मांढरे बसत होते. यंदा 2022 त्यांना बगाड्या होण्याचा व नवसपूर्तीचा मान मिळाला.बगाड्याचे वडील हनुमंत नाथबा मांढरे यांनी 1984 ला बगाड घेतले होते. हनुमंत मांढरे यांचे वडील नाथबा मांढरे यांनी आपल्याला मुलगा व्हावा म्हणून भैरव नाथास नवस केला होता. नाथबा मांढरे यांना आठ मुली होत्या.नववा मुलगा हनुमंता झाला. हनुमंतराव मांढरे मोठे झाल्यावर नवसपूर्तीसाठी बसले व त्यांच्यावर 1984 ला बगाड आले वडिलांनी मुलगा व्हावा म्हणून केलेल्या नवस स्वतः मुलगा हणमंतराव मांढरे यांनीच बगाड घेऊन फेडला.शेलारवाडी बावधन तालुका वाई येथील मांढरे कुटुंब वारकरी संप्रदायाचे आहेत. हनुमंतराव मांढरे वाई तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष होते अति उत्तम कीर्तनकार होते. बगाड्या बाळासाहेब मांढरे वारकरी माळकरी आहेत. त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर माऊली मांढरे तरुण कीर्तनकार म्हणून सुप्रसिद्ध आहेत.शेलारवाडी गावाला बगाडाचा पुन्हा बहुमान मिळाल्याने गावात उत्साहाचे आनंदाचे वातावरण निर्माण झाला.