•एकजण तुतारी घेण्याच धैर्य दाखवायचं म्हणतोय, तर एकजण जनतेला निर्भय बनवायचं म्हणतोय!
दहिवडी : ता.२८
माढा लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा तिढा काही सुटायचा दिसत नाही. रासपच्या महादेव जानकर यांनी सुरुवातीला रणजित निंबाळकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अनेक सभा घेत महाविकास आघाडीतर्फे लढायचे किंवा रासप स्वतंत्र लढणार, असे संकेत दिले होते. मात्र अचानक त्यांनी राजकीय उलटफेर घडवत थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गळाभेट घेतली. त्यामुळे महादेव जानकर यांनी सध्या माढा लोकसभा मतदार संघातून माघार घेतली असली तरी महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा तिढा अद्यापपर्यंत सुटला नसल्याने माढा लोकसभा निवडणूक नेमकं कोण लढवणार याबाबत सर्वसामान्य लोकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
महाविकास आघाडीकडून आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून एकीकडे अभयसिंह जगताप प्रयत्नशील आहेत,तर दुसरीकडे भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही, म्हणून उघड उघड दंड थोपटून बंड करण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील तुतारी मोठ्या धैर्याने हातात घेण्याच्या तयारीत आहेत. शरद पवार यांच्यासोबत बैठक करून धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभा मतदार संघाचा गाडा नेटाने ओढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याबाबत जयसिंह मोहिते पाटील यांनी स्पष्ट वक्तव्य करत धैर्यशील मोहिते हे शरद पवार गटात जाणार आहेत असे सांगितले आहे.
तर दुसरीकडे अभयसिंह जगताप यांनीही उमेदवारी आपल्यालाच मिळणार, म्हणून जोर लावला आहे. माण तालुक्याला लोकसभेत जाण्याची संधी मिळावी म्हणून म्हसवडमध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा घेत शक्तीप्रदर्शनाला सुरुवात केली आहे. काहीही झालं तरी अभय जगताप यांना उमेदवारी मिळालीच पाहिजे, यासाठी कार्यकर्ते इच्छुक आहेत. त्याचप्रमाणे धैर्यशील मोहिते पाटील यांनाच उमेदवारी द्यावी म्हणून मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या संकटमोचक असणाऱ्या गिरीश महाजन यांना घेराव घातला होता. त्याचबरोबर महाजन यांच्यासमोरच तुतारी हाती घेण्याची भाषा केली होती. त्यामुळे गिरीश महाजन यांनाही मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्यात अपयश आले होते.
मोहिते पाटील यांचा आधीपासूनच रणजित निंबाळकर यांना मोठा राजकीय विरोध आहे. त्यामुळे काहीही झाले तरी धैर्यशील मोहिते हे काहीही झालं तरी मागे हटण्याच्या तयारीत नाहीत.
भले शरद पवार यांनीदेखील धैर्यशील मोहिते यांना उमेदवारी नाही दिली, तर अपक्ष लढण्याची जिद्द मनात घेऊन काहीही झालं तरी धैर्यशील मोहिते हे लढणारच! अशी एकंदरीत स्थिती आहे. त्यामुळे अभयसिंह जगताप आणि धैर्यशील मोहिते पाटील या दोन तोलामोलाच्या
इच्छुक उमेदवारांबाबत शरद पवार कोणता निर्णय घेणार? उमेदवारी नेमकी कुणाला देणार? महाविकास आघाडीकडून देण्यात येणाऱ्या माढा लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीचा तिढा नेमका कसा सुटणार? याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.






















