महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसातारा, दि. २३ मार्च : सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी पायाभूत प्रशिक्षण देणारी देशातील प्रतिष्ठित संस्था असलेली राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) विद्यार्थिनींच्या पहिल्या तुकडीला प्रशिक्षण देण्यास सज्ज झाली आहे. जून २०२२ पासून खडकवासला (पुणे) येथील प्रबोधिनीच्या आवारात विद्यार्थ्यांबरोबर विद्यार्थिनींचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. त्यासाठी देशभरातून १९ मुलींची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतर्फे मंगळवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबत माहिती देण्यात आली आहे. साडेसोळा वर्ष वयोगटातील मुलींची केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेली लेखी प्रवेश परीक्षा, सव्र्हिस सिलेक्शन बोर्ड मुलाखती आणि वैद्यकीय परीक्षा अशी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून या १९ मुलींची एनडीएच्या पहिल्या तुकडीसाठी निवड करण्यात आली आहे. निवडण्यात आलेल्या १९ पैकी १० विद्यार्थिनी भारतीय लष्कर प्रशिक्षणासाठी, सहा विद्यार्थिनी हवाईदल प्रशिक्षणासाठी तर तीन विद्यार्थिनी नौदल प्रशिक्षणासाठी एनडीएमध्ये दाखल होणार आहेत. भविष्यात युद्धभूमीवर सैन्यदलांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आवश्यक व्यावसायिक, नैतिक आणि शारीरिक प्रशिक्षण देण्यासाठीचे सर्वोत्कृष्ट शैक्षणिक केंद्र म्हणून एनडीएचा लौकिक आहे. विद्यार्थ्यांसाठी सध्या असलेल्या अभ्यासक्रमात काही आवश्यक किमान बदल करून विद्यार्थिनींच्या प्रशिक्षणाची तयारी एनडीएमध्ये करण्यात आली आहे. महिला आणि पुरुष यांच्यातील शारीरिक फरकांचा विचार करून मुलींच्या प्रशिक्षणामध्ये काही मूलभूत बदल करण्यात येऊ शकतात, असेही प्रबोधिनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थिनींच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षक आणि कर्मचारी यांची नियुक्ती केली जाईल.
महिला अधिकाऱ्यांना पुरुषांच्या तुकडय़ांचे नेतृत्व करण्याची संभाव्य गरज लक्षात घेऊन, ऑफिसर्स ट्रनिंग अकॅडमी चेन्नई, इंडियन नेव्हल अकॅडमी एझिमला आणि इंडियन एअर फोर्स अकॅडमी हैदराबाद यांच्या धर्तीवर विद्यार्थिनींचे प्रशिक्षण पूर्ण केले जाणार असल्याचे एनडीएकडून सांगण्यात आले आहे. विद्यार्थिनींच्या वास्तव्य आणि प्रशिक्षणासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे. त्यासाठी पायाभूत सुविधांची उभारणी, आवश्यकतेनुसार नूतनीकरण यांवर भर देण्यात येत आहे. तसेच दीर्घकालीन गरजेचा विचार करता विद्यार्थिनींच्या स्वतंत्र स्क्वॉड्रनचे नियोजनही करण्यात येत असल्याचे एनडीएकडून सांगण्यात आले आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एनडीए प्रवेशाचे दरवाजे मुलींसाठी उघडण्यात यावेत आणि त्याची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी असे आदेश दिले. त्या पाश्र्वभूमीवर जून २०२२ मध्ये मुलींची पहिली तुकडी एनडीएमधील प्रशिक्षणासाठी रुजू होणार आहे.