दहिवडी : ता.०५
माण तालुक्याचे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष आणि माजी कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांच्याकडून पद काढून घेत भाजपने माण तालुक्याची मंडलनिहाय विभागणी केली. त्यानंतर म्हसवड आणि दहिवडी अशी दोन मंडले तयार करण्यात आली. त्यामध्ये शिवाजीराव शिंदे यांच्याकडून तालुकाध्यक्ष पद काढून घेत म्हसवड मंडल अध्यक्षपद बहाल केले गेल्याने त्यांचे भाजपमध्ये प्रमोशन की डिमोशन अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरात रंगली आहे.
एकूण १०५गावांच्या आणि ९६ग्रामपंचायतीच्या माण तालुक्याची मंडलनिहाय विभागणी भाजपला का करावी वाटली? भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या डोक्यात माणच्या आगामी निवडनुकांसंदर्भातील राजकारणाबाबत नेमकं काय शिजतंय? येणाऱ्या काळात आगामी निवडणुकांच्या दृष्टीने त्यांची अशी वेगळी कोणती रणनीती तयार आहे का? असे अनेक सवाल माणमधील जनतेमधून आता उपस्थित होऊ लागले आहेत.
२०२२ साली १८ फेब्रुवारीच्या दरम्यान शिवाजी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यादरम्यान त्यांनी वैयक्तिक अडचणी आणि कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले होते. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनाही त्यांनी राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली होती.
मात्र त्यावेळी आमदार जयकुमार गोरे यांच्यात आणि शिवाजीराव शिंदे यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्यानेच शिंदे यांनी राजीनामा दिल्याची मोठी चर्चा माणमध्ये रंगली होती. भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी एकमेकांच्या मनात असलेल्या दूषित भावना सामंजस्याने दूर केल्यामुळेच त्यांनी आपला राजीनामा परत घेतला, अशीही लोकांमध्ये चर्चा आहे.
खटाव तालुक्यासाठी भाजपच्या माध्यमातून एकच पद ठेवत धनंजय चव्हाण हे तालुकाध्यक्ष पदावर कायम राहिले, मात्र माणमध्ये दहिवडी व्यतिरिक्त म्हसवड मंडल तयार करत म्हसवड शहराव्यतिरिक्त फक्त ३० गावांपुरताच पदभार त्यांना देण्यात आला. यामुळे भाजपमधील शिवाजीराव शिंदे यांचा गट नाराज असल्याचीही चर्चा तालुक्यातील राजकीय वर्तुळात रंगली आहे. माणमध्ये नव्याने तयार झालेल्या दोन मंडलामधील दहिवडी मंडलाचे पद सध्या रिक्त असून दहिवडी शहराचेही शहराध्यक्ष पद रिक्त आहे. त्यामुळे दहिवडी मंडलाच्या या रिक्त पदावर शिवाजीराव शिंदे यांच्याप्रमाणेच भाजपचे निष्ठेने काम करणारा दुसरा कोणता कार्यकर्ता बसणार? याविषयी माणमधील जनतेच्या मनात साशंकता कायम आहे.