महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : माहिती तंत्रज्ञान, औद्योगिक नगरी म्हणून उदयास येत असलेल्या आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणा-या पुण्यात मोठे विमानतळ उभारावे अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केली. लोकसभेत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अनुदान मागणी चर्चेवेळी बोलताना खा.श्रीनिवास पाटील यांनी ही मागणी केली. ते म्हणाले, मी महाविद्यालयीन शिक्षणासाठी १९५७ साली पुण्यात आलो होतो. तेव्हा पुण्याची लोकसंख्या केवळ ३ लाख होती. आता तेथील लोकसंख्येत वाढ होऊन ३५ लाख झाली आहे. तर जे नवीन शहर वसले आहे त्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या १५ लाख आहे. त्याकाळी १९५७ ला सुद्धा तेथे विमानतळ होते. त्यानंतर मात्र त्याची व्याप्ती वाढवण्यात आलेली नाही. पुणे नगरी ही लोकमान्य टिळक यांची आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंची आहे, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची तशीच ती धोंडो केशव कर्वे ह्यांची देखील आहे. तसेच महाराष्ट्र आणि देशाची एक सांस्कृतिक नगरी म्हणून तिची वेगळी ओळख आहे. याठिकाणी विमानतळ होणार आहे अशी चर्चा अनेक दिवसांपासून ऐकायला मिळत आहे. त्यानुसार छत्रपती संभाजी राजेंच्या नावाने पुरंदर हवेलीच्या जवळपास एक विमानतळ होणार होते. तर तळेगाव चाकण परिसरातही विमानतळ साकारणार होते असे बोलले जायचे.
सध्याची विमानतळाची जी छोटीशी जागा आहे, ते विमानतळ मिलिटरी आणि नागरिकांसाठी असल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. परिणामी नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ६० लाखाहून जास्त लोकसंख्या असलेलेल्या भारातातील मोठ्या शहर परिसरात जेथे पुणे, खडकी, देहूरोड सारख्या तीन लष्करी छावण्या आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड ह्या दोन महानगरपालिका आणि ११ नगरपालिका आहेत. तर ही भूमी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची असल्याने त्या तीर्थस्थळाला मोठ्या संख्येने भाविक व नागरिक भेट देत असतात. त्यामुळे येथे विमानतळ होणे गरजेचे आहे.पुण्यात विमानतळ होणार ही चर्चा कित्येक वर्षापासून सुरू आहे. ही चर्चा वास्तवात येऊन तेथे प्रत्यक्षात विमानतळ साकार झाल्यास तसेच त्याचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने झाल्यास ही सर्वांसाठी आनंदाची बाब असेल. तरी पुणे येथे लवकरात लवकर विमानतळ उभारावे अशी मागणी त्यांनी लोकसभेत केली.