मारूल हवेली येथे प्राथ.आरोग्य केंद्र मंजूरशासनाची मान्यता ; खा.श्रीनिवास पाटील यांचा पाठपुरावा
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून मारूल हवेली (ता.पाटण) येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राला शासनाची मान्यता मिळाली आहे. तशी माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली असून या आरोग्य केंद्रामुळे विभागातील दिवशी बुद्रुक, पापर्डे, कोरिवळे, टेळेवाडी, बोंद्रेवाडी, जुळेवाडी, बहुले, पाळेकरवाडी, हावळेवाडी, जरेवाडी, गारवडे, सोनाईचीवाडी, नावडी, वेताळवाडी आदी गावांसह इतर वाडीवस्तीवरील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवेचा मोठा फायदा होणार आहे. मारूल हवेली विभागात आरोग्य केंद्र नसल्याने परिसरातील नागरिक रुग्णांना उपचारासाठी मरळी, मल्हारपेठ अथवा पाटण येथे जावे लागत आहे. त्यामुळे याबाबत खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे येथील ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्यानुसार खा.पाटील यांनी लक्ष देऊन प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीसाठी पाठपुरावा सुरू केला होता. मारूल हवेली विभाग हा दुर्गम डोंगरी भाग आहे. त्याठिकाणी दळणवळणाची पुरेशी सोय उपलब्ध नाही. या परिसरात अनेक गावे असून दिवसेंदिवस येथील लोकसंख्येत वाढ होत आहे. तसेच वन्य प्राण्यांची संख्या देखील वाढत आहे. रात्री अपरात्री गावात सर्पदंश, श्वानदंश झाल्यास किंवा अन्य अत्यावश्यक आरोग्य सेवा हवी असल्यास ती स्थानिक पातळीवर उपलब्ध होत नाही. यासाठी खा.श्रीनिवास पाटील यांनी मारूल हवेली या मध्यवर्ती ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारावे अशी मागणी करत संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

त्यांच्या या प्रयत्नाला यश आले असून मारुल हवेली येथे विशेष बाब म्हणून नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. सदर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी विहित पद्धतीने जागा उपलब्ध करून त्या जागी प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम हे जिल्हा परिषद कार्यालयाकडून पूर्ण झाल्यावर आरोग्य विभागाकडून पद निर्मितीची स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान मारूल हवेली येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र साकारत असल्याने विभागातील नागरिकांना विशेषतः गोरगरिबांना याचा मोठा फायदा होणार आहे. प्रस्तावित केंद्रातून आरोग्य सेवा मिळणार असल्याने विभागाच्या गावातील नागरिकांनी खा.श्रीनिवास पाटील यांचे आभार मानले आहेत.
| ReplyForward |






















