सातारा- संपूर्ण जावली तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या केळघरसह १५ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या केळघर विकास सेवा सोसायटीची निवडणुक नुकतीच बिनविरोध झाली. या सोसायटीच्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्याचा निश्चित प्रयत्न नवनिर्वाचित संचालक मंडळ करेल. केळघर सोसायटी आणि सभासद शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आपण कायम सहकार्य करू, असा शब्द आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
केळघर सोसायटीच्या चेअरमनपदी रामभाऊ शेलार तर व्हा. चेअरमनपदी संपत सुर्वे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व केळघर विकास सेवा सोसायटीचे संचालक ज्ञानदेव रांजणे, माजी चेअरमन बबन बेलोशे, माजी व्हा. चेअरमन व संचालक नारायण जाधव, संचालक जगन्नाथ शेलार, शांताराम बेलोशे, सचिव आनंदा शेलार, वरोशी सोसायटीचे चेअरमन मोहन कासुर्डे, कुरुळशीचे सरपंच रमेश वाडकर, समिर शेलार, कोंडीबा कासुर्डे, ज्ञानदेव कासुर्डे, अंकुश कासुर्डे यांचेसह केळघर, वरोशी सोसायटीचे सभासद उपस्थित होते.
सोसायटीची निवडणूक बिनविरोध करून सर्व सभासद आणि पदाधिकाऱ्यांनी चांगला आदर्श घालून दिला आहे. नूतन पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली असून संस्थेची आणि सभासदांची प्रगती साधण्यासाठी सर्वांनी एकदिलाने कामकाज करावे आणि सोसायटीला एक आदर्श सहकारी संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त करून द्यावा, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.