मुंबई : मुंबई वगळता राज्यात गेल्या तीन वर्षांत आढळलेल्या ‘एचआयव्ही’ग्रस्तांच्या तुलनेत ५.८४ टक्के ते २१.७५ टक्क्यांपर्यंत मृत्यू नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबईने माहितीच्या अधिकारात ही आकडेवारी दिली आहे.
मुंबई वगळता राज्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत एचआयव्हीचे १० हजार ८६ रुग्ण आढळले. यातील २ हजार १९४ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूचे हे प्रमाण २१.७५ टक्के होते. करोना काळ असलेल्या २०२० मध्ये २०१९ च्या तुलनेत कमी म्हणजे ६ हजार १५५ रुग्ण आढळले, तर १ हजार १२४ मृत्यू झाले. मृत्यूचे हे प्रमाण १८.२६ टक्के होते. २०२१ मध्ये ७ हजार ६७९ रुग्ण आढळले तर १ हजार २१७ मृत्यू झाले. मृत्यूचे हे प्रमाण १५.८४ टक्के नोंदवले गेले. सगळी यंत्रणा करोनाशी संबंधित कामात गुंतल्याने इतर आजारांकडे दुर्लक्ष झाले. दुसरीकडे कडक टाळेबंदी व निर्बंधामुळे बरेच एचआयव्हीग्रस्त रुग्णालयात पोहचू शकले नाहीत. त्यानंतरही एमसॅकने मोठय़ा प्रमाणात रुग्णांच्या घरापर्यंत औषधांचा पुरवठा केला. परंतु या काळात निर्बंधामुळे नवीन रुग्ण शोधण्यावर मर्यादा आली. त्यामुळेच रुग्णसंख्या कमी दिसत असावी, असा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे