महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सातारा, दि. ३० मार्च : गेल्या पंधरा वर्षांत राज्य शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केलेली नाही. तसेच चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची ५२ हजार पदे रद्द केली आहेत. गेल्या काही दिवसांत शाळांतील मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत असल्याने मुला-मुलींच्या सुरक्षिततेचा विचार करून कायमस्वरूपी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला परवानगी देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाने केली आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुण्यातील दोन घटनांनी ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांची सुरक्षितता ही महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे शिक्षकेतर महामंडळाने या पूर्वी अनेक वेळा शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यासाठी आंदोलनेही करण्यात आली. मात्र शासनाचे त्याकडे दुर्लक्षच आहे. आता शासनाने वेळ न घालवता शाळांतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेस परवानगी देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबरोबरच संस्थाचालक, मुख्याध्यापकांनाही शाळा प्रशासन चालवताना चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याची गरज भासते. या पूर्वीच्या घटना लक्षात घेऊन शासनाने भरतीला परवानगी दिली असती, गैरप्रकार रोखणे शक्य झाले असते, असे जिल्हा शिक्षकेतर संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.