महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नाने वांग मध्यम प्रकल्प (ता.पाटण) अंतर्गत कराड तालुक्यातील पुनर्वसित गावठाण मौजे कोळे व मोजे घारेवाडी येथील विकासकामांसाठी 2.50 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी मंजूर झाल्याने सदर पुनर्वसित गावठाणचे अनेक दिवसापासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागणार आहेत. वांग मध्यम प्रकल्प अंतर्गत पुनर्वसित गावठाण कोळे व घारेवाडी येथील मूलभूत सोयीसुविधांची कामे अनेक दिवसापासून प्रलंबित राहिली आहेत. त्यामुळे स्थानिकांची गैरसोय होत असल्याने काही नागरिकांनी खा.श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन सदरची कामे रखडल्याची माहिती दिली होती. तसेच त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची विनंती त्यांनी खा.पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार खा.पाटील यांनी याबाबत प्रशासकीय पातळीवर पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता.
खा.श्रीनिवास पाटील यांनी या संदर्भात केलेल्या प्रयत्नाला यश आले असून जलसंपदा विभागाने वांग मध्यम प्रकल्प (ता.पाटण) अंतर्गत पुनर्वसित गावठाण मौजे घारेवाडी (ता. कराड) येथील अंतर्गत रस्ते व पोहोच रस्ता करणे, आरसीसी पाईप नलिका मोरी बांधणे तसेच शवदाहिनी संचाचा पुरवठा करून बसवण्याच्या कामासाठी 1 कोटी 4 लाख रुपये मंजूर केले आहेत. तसेच पुनर्वसित गावठाण मौजे कोळे (ता.कराड) येथे अंतर्गत रस्ते व पोहोच रस्ता करणे, आरसीसी पाईप नलिका मोरी बांधणे व शवदाहिनी संचाचा पुरवठा करून बसवणे कामासाठी 1 कोटी 44 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत. खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नामुळे जलसंपदा विभागाकडून स्थानिक कामासाठी निधी उपलब्ध झाला असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यासाठी जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील, अप्पर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, कार्यकारी अभियंता सुरेन हिरे यांचे सहकार्य लाभले. पाटण व कराड तालुक्यातील पुनर्वसन झालेल्या अनेक गावांचे प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. पुनर्वसित गावांच्या मूलभूत नागरी सोयीसुविधांबाबत ना.जयंत पाटील यांच्याशी पत्रव्यवहार करून प्रसंगी भेट घेऊन शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. ते सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत खा.श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले. दरम्यान कोळे व घारेवाडी येथील विकासकामांसठी निधी मंजूर झाल्याबद्दल ग्रामस्थांनी खा.पाटील यांचे आभार मानले आहेत.Attachments area