सातारा- राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेसह नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने नगरविकास खात्याच्या माध्यमातून आपल्या सातारा शहर नगरपालिकेस हद्दवाढ क्षेत्रातील नागरी समस्यांच्या सोडवणुकीसाठी रु.४८ कोटींचा निधी मंजूर झाला असून नजीकच्या काळात शाहूपुरीसह हद्दवाढीत समाविष्ट सर्वच भागातील उर्वरित समस्या सुटण्यास या निधीची निश्चितच मदत होईल, असे प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. दरम्यान, निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांच्यावतीने आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार आणि ना. शिंदे यांचे आभार मानले.
तामजाईनगर, शाहूपुरी येथील माजी उपसरपंच विकास देशमुख यांच्या शुभम या मिनी मॉलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी शाहूपुरी ग्रामविकास आघाडीचे भारत भोसले, फिरोज पठाण, मासचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ जाधव, सुहास वहाळकर, सौ.शोभाताई केंडे, सौ.माधवीताई शेटे, उदय इंदलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी तामजाईनगर येथील नागरिकांच्या रस्ते, पाणी आदी प्रमुख प्रश्नांना योग्य तो न्याय देऊन हे प्रश्न मार्गी लावल्याबद्दल नागरिकांच्या वतीने उजगारे दांपत्यानी आ. शिवेंद्रसिंहराजेंचा जाहीर सत्कार केला. तसेच, मासच्या नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजेंद्र मोहिते यांचेसह शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कारप्राप्त सी.जी.चव्हाण सर व दिलीप नेवसे सरांचा आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सौ.अलका उजगारे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्री.ईकबाल काझी यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले. कार्यक्रमास सतीश सुर्यवंशी, विजय गार्डे, राजाभाऊ गावडे, दिलीप चव्हाण, सुरेश चव्हाण, निखिल प्रभाळे, संदीप किर्दत ,अमर इंदलकर, निखिल भोसले, आशिष नेवसे, वसंत शिंदे, सचिन कांबळे यांचेसह परिसरातील जेष्ठ नागरिक, महिला व युवकांची उपस्थिती होती.