विजेता मल्ल पृथ्वीराज पाटील नाराजी नंतर संयोजकांचा कारभार चव्हाट्यावर,
कुस्ती स्पर्धेच्या निधीच्या ऑडिटची मागणी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सातारा, दि. ११ एप्रिल : तब्ब्ल ६० वर्षांनी कुस्ती क्षेत्रात अत्यंत मानाची समजली जाणारी ६४ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नुकतीच ऐतिहासिक सातारा नगरीच्या छ. शाहू स्टेडियमवर संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये कोल्हापूरचा मल्ल पृथ्वीराज पाटील याने अत्यंत चुरशीच्या लढतीत सोलापूरचा मल्ल विशाल बनकर याच्यावर मात करून मानाची महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा पटकावली. अंतिम कुस्ती संपन्न झाल्यानंतर बक्षीस समारंभाच्यावेळी विजेता मल्ल पृथ्वीराज पाटीलला मान्यवरांच्या हस्ते मानाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले. परंतु चांदीच्या गदेबरोबर रोख रकमेचे पारितोषिक न दिल्यामुळे पृथ्वीराज पाटीलने माध्यमांशी बोलताना संयोजकांच्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारची घटना महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच घडली असून यामुळे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात सातारची प्रतिमा मलिन झाली आहे. याला सर्वस्वी या स्पर्धेचे आयोजक जबाबदार असल्याची चर्चा सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांच्यामध्ये सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, राज्य पातळीवरील एवढी मोठी स्पर्धा पार पाडण्यासाठी राज्य शासनाकडून तसेच प्रयोजकांकडून आयोजकांना मोठा आर्थिक निधी उपलब्ध करून दिला जातो. हा आर्थिक निधी आयोजकांनी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वापरायचा असतो. तसेच या आर्थिक निधीतूनच स्पर्धा विजेत्या मल्लाला रोख रकमेचे पारितोषिकही दिले जाते, हा आज पर्यंतचा इतिहास आहे. सातारच्या स्पर्धेतील विजेता मल्ल पृथ्वीराज पाटीलला मात्र रोख रकमेचे पारितोषिक आयोजकांनी न दिल्यामुळे पाटीलने नाराजी व्यक्त केली आहे. पाटीलचे म्हणणे होते की,अनेक वर्षे मेहनत केल्यावर स्पर्धा जिंकल्यानंतर बक्षीस रूपाने फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून रोख रकमेचे पारितोषिक मिळाले पाहिजे होते.
सदरची स्पर्धा सुरु झाल्यापासून संपेपर्यंत स्पर्धेच्या एकूण नियोजनाबाबत मल्ल आणि कुस्ती शौकीन यांच्यातून नाराजीचा सूर उमटत होता. कारण मल्लांना स्पर्धेच्या ठिकाणी आणि निवासाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी प्रवासाचा खूपच त्रास सहन करावा लागला होता. स्पर्धेच्या एकूण नियोजनाबाबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कुस्ती शौकिनांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती.अशावेळी आयोजकांनी मिळालेल्या आर्थिक निधीचे केले काय ? असा संतप्त सवाल आता जनतेमधून विचारला जात आहे.
एकंदरच स्पर्धा सुरु झाल्यापासून महाराष्ट्र केसरी विजेता मल्ल पृथ्वीराज पाटीलने व्यक्त केलेल्या नाराजी वक्त्यव्यापर्यंत संयोजकांनी स्पर्धेचे केलेले नियोजन हे ढिसाळ होते, हे स्पष्टच झालेले आहे. शासनाकडून तसेच प्रयोजकांकडून मिळालेल्या कोट्यवधी रुपायांच्या निधीचा अपहार झाला आहे का ? या स्पर्धेसाठी आलेला सुमारे ३ ते ४ कोटी रुपयांचा निधी गेला कुठे ? असा सूर स्पर्धेत सहभागी झालेल्या मल्लांमधून तसेच कुस्ती शौकिनांमधून उमटत आहे.
* स्पर्धा सुरु झाल्यापासून संयोजकांच्याकडून स्पर्धेसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले गेले. अशावेळी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला बक्षिसाची रक्कम संयोजक म्हणून आम्ही द्यावी, असे यजमानपद घेताना ठरलेले नव्हते. त्यामुळे बक्षिसाची ५१ हजार रुपये रक्कम द्यायला कोणतीच अडचण नव्हती-दीपक पवार, संयोजक, ६४ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा
* संयोजकांच्याकडून कुस्तीगीर परिषदेला देण्यात आलेल्या चेकची रक्कम ही पंचांचे मानधन व अन्य बाबींसाठी वापरण्यात आली. बक्षिसासाठी म्हणून कोणताही निधी अथवा चेक कुस्तीगीर परिषदेकडे देण्यात आलेला नव्हता.
ललित लांडगे, कार्यालयीन सचिव, महाराष्ट्र्र राज्य कुस्तीगीर परिषद
* बक्षिसाची ५१ हजार रुपये रक्कम देण्यास कोणतीही अडचण नव्हती, असे संयोजक माध्यमांसमोर म्हणत असतील तर वर्षभर मेहनत करून विजयी झालेल्या मल्लाला सदर बक्षिसाची रक्कम दिली गेलीच पाहिजे. कारण बक्षिसाची रक्कम मिळणे हा त्या विजयी मल्लाचा हक्कच आहे. संयोजकांनी सदरची बक्षिसाची रक्कम पृथ्वीराज पाटीलला देऊन जिल्ह्याची होणारी बदनामी थांबवावी.
एक कुस्ती शौकीन, सातारा