म्हसवड — वीर जवान अजिंक्य किसन राऊत यांच्यावर रात्री उशिरा लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. यावेळी अजिंक्य यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. यावेळी ” शहीद जवान अजिंक्य राऊत अमर रहे ” च्या घोषणा व साश्रुनयनांनी या वीरपुत्राला जवानांनी अखेरची मानवंदना दिली. यावेळी अनेकांच्या अश्रुंचा बांध फुटला होता. वीरपुत्राला अखेरचा निरोप देताना वातावरण सुन्न झाले होते. विशेष म्हणजे या अंत्यविधीच्या कार्यक्रमावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले.
शेतकरी कुटुंबातून आलेले अजिंक्य राऊत यांचे लहानपणा पासूनच सैन्यात भरती होण्याचे स्वप्न होते व त्यांनी स्वबळावर व स्वकष्टावर साकारले. गेली दोन वर्षापासून अजिंक्य सिंकदराबाद येथील आर्मि हॅास्पिटलमध्ये कार्यरत होते. दरम्यान त्यांनी वेळी अवेळी कामावर हजर रहावे लागत असल्याने कामाचा प्रचंड ताण पडत असल्याने त्यांचे स्वतःच्या प्रकृतीकडे कळत नकळत दुलर्क्ष होत असल्याची कधीकधी फोनवरून कबूली अजिंक्य देत असल्याचे मित्र सांगत होते. कोरोनाचा भर असलेल्या काळात तर जीवावर उदार होऊन काम करावे लागत असल्याचे सांगितले. अगदी निधन होण्यापूर्वी एक दिवस अगोदर देखील अजिंक्यचा मित्रांना फोन झाला होता.त्यावेळी प्रकृती अस्वस्थ आसल्याने याच हॅास्पिटलमध्ये भरती होत असल्याचा फोनही त्यांनी मित्रांना केला होता. त्यानंतर मित्रांनी काळजी व्यक्त केली असता भीतीचे कारण नसल्याचे अजिंक्य यांनी सांगितले. मात्र अचानक त्यांच्या मृत्यूची वार्ता कळताच नोकरीव्यवसाय निमित्ताने बाहेर गावी असलेल्या मित्रमंडळीनी लगेच खटावला धाव घेतली.
अजिंक्यांच्या पश्चात आईवडील,एक भाऊ व पत्नी असा परिवार आहे. दोनच महिन्यांपूर्वी सुट्टी संपून कामावर हजर झाले होते. सुट्टीच्या काळात मुलांना कॅालेजच्या मैदानावर भरतीला उपयोगी मार्गदर्शन करत. खासकरून गरीब मुलांना ते विशेष प्रशिक्षण व प्रोत्साहन देत असत.अजिंक्यचा लहान भाऊ अक्षय राऊत हा इंडियन एअर फोर्समध्ये गरुड फोर्समध्ये कार्यरत आहे. अजिंक्य यांच्या आईवडीलांना व पत्नीला मृत्यूची वार्ता कळताच त्यांनी सिंकदराबादकडे धाव घेतली. गावचा सुपुत्राला वीरमरण आल्याचे वृत्त गावात कळताच वातावरण सुन्न झाले त्यानंतर सर्वसंमतीने गावचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले. अजिंक्यचा मित्रपरिवारही मोठा आहे. गावातील त्यांच्या मित्रांनी जागोजागी अभिवादनाचे फलक लावत श्रध्दांजली वाहिली.
वीर जवान अजिंक्य यांचे पार्थिव सिंकदराबादवरून खटाव येथे आणण्यात आले. यानंतर अजिंक्य यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.नंतर फुलांनी सजवलेल्या विशेष वाहनांमधून त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कार स्थळी नेण्यासाठी गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली.रस्त्यावर रांगोळी व फुलांच्या पाकळ्यांनी अंत्ययात्रेचे स्वागत करण्यात आले.अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी जनसागर लोटला होता.अंतिम संस्कारासाठी येथील पिंपळेश्वर मंदिर परिसरात चौथरा सजवण्यात आला होता. अंत्ययात्रा अंतिम ठिकाणी पोहचताच लष्कर व पोलिस अधिकार्यांनी पुष्पचक्र अर्पण केले.यावेळी लोकप्रतिनिधी व नागरिकांनी पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली.
वीरजवान अजिंक्य यांच्या पार्थिवाला लपेटलेला तिरंगी ध्वज काढून लष्करी अधिकार्यांनी वीरपत्नी कोमल यांना सुपूर्त करताच उपस्थितांचे काळीज हेलावून गेले. यावेळी वीर जवानाला मानवंदना देण्यात आली. अजिंक्य यांचे भाऊ अक्षय याने आपल्या वीरबंधूच्या पार्थिवाला भडाग्नी देताच उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते, आमदार महेश शिंदे,युवा नेते राहुल पाटील,सरपंच नंदकुमार वायदंडे,उपसरपंच अमर देशमुख,जयहिंद फाउंडेशन तालुका अध्यक्ष हेमलता फडतरे, लष्करी अधिकारी,पोलीस अधिकारी,महसूल व इतर शासकीय अधिकारी यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली.