तळमावले/वार्ताहर‘स्त्री जन्माच्या स्वागता’ चा संदेश देत पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील सौ.रेश्मा डाकवे, डाॅ.संदीप डाकवे आणि संपूर्ण डाकवे परिवाराच्यावतीने लाडक्या लेकीचे स्वागत फुलांचे रेड कार्पेट आणि “लक्ष्मीची पाऊले” अशी कॅलिग्राफी केलेल्या पांढऱ्या वस्त्रावर तिच्या पावलाचे ठसे घेवून केले. यावेळी ज्योती पाटील, गयाबाई डाकवे, गौरी डाकवे, पारुबाई येळवे, रत्ना काळे, सुमन डाकवे, वनिता डाकवे, सुरेखा वीर, सविता निवडूंगे, शोभा डाकवे, सुनिता डाकवे, आशा मुटल, हिराबाई डाकवे, सविता पाटील, नीता निवडुंगे व अन्य महिला उपस्थित होत्या. डाकवे कुटूंबात जन्माला आलेल्या छोट्या गोंडस चिमुरडीचे स्वागत आणि नामकरण सोहळा मोठया थाटामाटात संपन्न झाला. ‘सांची’ असे या चिमुरडीचे नामकरण करण्यात आले आहे.गटशिक्षणाधिकारी जमीला मुलाणी, डाॅ.कोमल कुंदप, अभिनेत्री सोनाली घाडगे, पत्रकार विद्या नारकर, प्रतिभा सावंत, तपस्या काशीद, माया देसाई, वनिता महाडीक, मनीषा आचरे, संगिता कौले, ह.भ.प.प्रीती माने, रेश्मा डाकवे या महिलांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन्मानपत्र, शाल, कोल्हापूरी फेटा बांधून ‘नारी रत्न’ पुरस्कार देवून गौरवण्यात आले. मुलगी झाल्यानंतर डाकवे परिवाराचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कुटूंबात जणू लक्ष्मी आली असे समजून डाकवे कुटूंबाने या घरात प्रवेश करताना कुंकुवाचे पाणी करुन या चिमुकल्या सांचीचे पाय कुंकवाच्या पाण्यात बुडवून उंबरठयाच्यानंतर जमिनीवर पसरलेल्या पांढऱ्या वस्त्रावर पायाचे ठसे उमटवून प्रवेश केला. या वस्त्रावर डाॅ.संदीप डाकवे यांनी ‘लक्ष्मीची पाऊले’ अशी सुंदर कॅलिग्राफी केली होती. यावेळी कुटूंबियांनी चिमुकलीला घरात प्रवेश करण्यासाठी अंगणापासून ते घरात जाईपर्यंत विविध प्रकारच्या फुलांच्या पाकळयांच्या पायघडया घालून फुलांचे जणू रेड कार्पेटच तयार केले होते.घरात आल्यानंतर चिमुकल्या सांचीचे आणि तिची आई सौ.रेश्मा हिचे औक्षण करण्यात आले.
‘‘वंशवेल मोहरली, घरी लक्ष्मी प्रकटली’’ अशीच भावना डाकवे परिवाराची झाली होती. नामकरणाच्यावेळी ती स्टेजवर येताच तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी झाली होती. नामकरण करताना सुर्यकांत डाकवे यांनी हार्मोनियम आणि लक्ष्मण डाकवे यांनी मृदंग वाजवत म्हटलेला पाळणा सर्वांना मंत्रमुग्ध करुन गेला. याशिवाय जेवणाचा आस्वाद घेत उपस्थितांच्या शुभेच्छा ही सुरु होत्या.याशिवाय घरासमोर घातलेल्या मंडपात सामाजिक संदेश देणाऱ्या तसेच कर्तृत्ववान महिलांचे फोटो असलेल्या आकर्षक पताका सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. या अनोख्या बारशाची परिसरात चर्चा रंगली होती. अशा पध्दतीने खऱ्या अर्थाने स्त्री जन्माचे स्वागत प्रत्येक घरातघरात व्हायला हवे. हा सोहळा पाहणाऱ्यांचे डोळे आनंदाने पाणावले होते. डाकवे परिवारातर्फे करण्यात आलेल्या या आगळयावेगळया सोहळयाचे परिसरात कौतुक होत आहे.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजाराम डाकवे, नितीन पाटील, अक्षय पाटील, भरत डाकवे, विठ्ठल डाकवे, विश्वनाथ डाकवे, सुनील पवार, जीवन काटेकर, प्रथमेश डाकवे, पौर्णिमा डाकवे, अक्षता वीर, स्पंदन डाकवे व अन्य यांनी विशेष परिश्रम घेतले.