उपजिल्हा रुग्णालयात दोन महिन्यात सिटीस्कॅन मशीन सुरु करणार २०० बेड व ट्रामा केअर सेंटर बाबतही लवकरच निर्णय आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची बैठकीत ग्वाही
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कराडच्या सौ वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दोन महिन्यात सिटीस्कॅन मशीन सुरु करण्यात येईल. तसेच उपजिल्हा रुग्णालयाला २०० बेडची मान्यता व ट्रामा केअर सेंटर बाबत प्राप्त झालेल्या प्रस्ताबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून त्यावरही लवकरच निर्णय घेण्याची ग्वाही आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिल्याचे प्रहारचे मनोज माळी यांनी सांगितले. उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयी दुर करण्याबाबत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी आरोग्य सेवा संचालक मुंबई उपसंचालक पुणे, राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे स्वियसहायक गौरव जाधव, सातारचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रकाश शिंदे, बाह्य रुग्ण शल्यचिकित्सक सातारा, मनोज माळी व भानुदास डाईंगडे, श्रीकांत यादव, बंटी मोरे उपस्थित होते. मनोज माळी यांच्या उपोषणाची दखल घेऊन व राज्य मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
मनोज माळी म्हणाले की, कराड, पाटणसह कडेगाव तालुक्यातील गोरगरीब रुग्णांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. याबाबत प्रहारच्या माध्यमातून आंदोलन व पाठपुरावा करण्यात येत आहे. ना बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून राज्यशासनाने याची दखल घेतल्याने उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयी दुर होण्यास सुरुवात झाली आहे असे मनोज माळी म्हणाले. बैठकीत उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तज्ञ डॉक्टर नेमण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच एन एच एम मधुन दंत चिकित्सक पद भरण्यासाठी राज्यमंत्र्यांनी आयुक्तांना सुचना दिल्या आहेत. तसेच डायलेसिस विभागासाठी तज्ञ व स्टाफचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्याकडे प्रलंबित आहे. याबाबतही मंत्रीमहोदयांनी सुचना दिल्या आहेत. वर्ग चारची पदेही भरण्यात येणार असल्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हटल्याचे मनोज माळी यांनी सांगितले.