महाबळेश्वर तालुक्यातील अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात कोयना धरणाच्या बॅक वॉटरच्या कडेला असणाऱ्या खरोशी येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल खरोशी ता महाबळेश्वर जि सातारा या शाळेतील विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीतून कै.आनंदा सुर्यवंशी चॅरीटेबल ट्रस्ट पाडेगाव ता खंडाळा जि सातारा यांच्यावतीने हार्मोनियम पेटी शाळेला भेट देण्यात आली. कै.आनंदा सुर्यवंशी चॅरीटेबल ट्रस्टचे सचिव श्री पवन सुर्यवंशी व मालोजीराजे विद्यालय लोणंद येथील एसएससी 1998 बॅच मधील मित्र यांनी खरोशीला जाऊन शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला व हार्मोनियम पेटी कै.आनंदा सुर्यवंशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भेट दिली. या वेळी या शाळेत सेवा बजावलेले शिक्षक श्री कुणाल खरात यांनी त्यांच्या चुलत भाऊ बुद्धवासी अक्षय खरात यांच्या स्मरणार्थ शाळेतील विद्यार्थ्याना क्रीडा साहित्य भेट दिले. त्याच बरोबर सर्व मित्रांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी IIT धारवाड येथील प्राध्यापक डॉ समर्थ राऊत यांनी विद्यार्थ्याना करियर विषयक अतिशय मोलाचे असे मार्गदर्शन केले.

या वेळी श्री कुणाल खरात, श्री पवन सुर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच हार्मोनियम पेटीच्या वापर करून शालेय परिपाठात राष्ट्रगीत, प्रार्थना घेण्यात यावी अशी अपेक्षा श्री पवन सुर्यवंशी यांनी व्यक्त केली. या वेळी शाळेतील एका विद्यार्थिनीने पेटीवर राष्ट्रगीत वाजवून दाखवले व सर्वांची मने जिंकली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री किर्दक सर यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी डॉ समर्थ राऊत, श्री पवन सुर्यवंशी,श्री कुणाल खरात, श्री मंगेश क्षिरसागर, श्री सिद्धेश खरात, श्री विक्रांत शहा, श्री दिनेश भाटिया व श्री प्रशांत शिंदे हे कार्यक्रमाला उपस्थित होते.




















