देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त माढा लोकसभा मतदारसंघामध्ये खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह आ. जयकुमार गोरे यांचा सेवा पंधरवडा सुरु आहे. यानिमित्त फलटण तालुक्यातील अनेक गावांमध्ये, लोकांच्या अडचणी जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात प्रयत्न सुरु आहेत. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावातील कुटूंबाला स्वच्छ पाणी मिळावे यासाठी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर स्वत: लक्ष घालीत आहेत. या अनुषंगाने आज दि. 18 रोजी फलटण शहरातील गजानन चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला.
फलटण शहरासह व तालुक्यास 30वर्षे भकास केल अशा रामराजेंनी, फलटणकरांच्या हक्काचे पाणी बारामतीला वळवले, अशांना आता घरी बसवण्याची वेळ आलेली आहे. भकास झालेल्या फलटण शहराचा विकास करण्यासाठी फलटण पालिकेवर भाजपचाच झेंडा फडकावणार असून येणार्या काळात विविध भानगडी करुन आर्थिक गैरव्यवहार करणार्या रामराजेंना या वयात हाफ चड्डीवर जेलमध्ये बसवण्याची वेळ येवू नये, असा घणाघात खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी फलटण येथे झालेल्या संवाद यात्रेत केला.
ज्यांनी 30 वर्षे बारामतीकरांची चाकरी करण्यासाठी फलटणच्या हक्काचे पाणी बारामतीला वळवून तालुक्यातील निष्पाप जनतेच्या तोंडाला पाने पुसली, त्यांचे आर्थिक नुकसान केले. मी खासदार झाल्या झाल्या फलटण तालुक्याच्या हक्काचे बारामतीला जाणारे पाणी बंद केले. सुमारे 23 वर्षानंतर फलटण-पुणे अशी रेल्वे धावली, फलटणकरांचे रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. फलटणच्या इतिहासात सर्वाधिक विकासनिधी मी आणला. एमआयडीसीच्या प्रलंबित फायलींची पूर्तता मी केली. गेली 30 वर्षे फलटणकरांच्या टाळूवरचे लोणी राजे कंपनीने खाल्ले आहे. गटारे, रस्ते संपूर्ण शहराची बिकट अवस्था झालेली आहे. सध्या शहरात डेंग्युची लाट सुरु आहे. फलटण शहर डेंग्यूच्या रुग्णांनी भरलेले आहे, ते केवळ फलटण पालिकेतील सत्ताधार्यांच्या निष्क्रीयतेमुळेच घडलेले आहे. गेल्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये सुमारे 1 हजार रुपयांच्या रस्त्यांच्या विकासाची कामे, 41 हजार कोटी रुपये खर्च असणारा नियोजित पुणे-बंगलोर महामार्ग अर्थात ग्रीन कॉरीडॉर फलटण तालुक्यासह माढा मतदारसंघाला उपयुक्त ठरणार आहे. गेल्या अडीच वर्षाच्या कालखंडात माझ्या खासदारकीच्या माध्यमातून फलटण च्या विकासासाठी सर्वाधिक विकासनिधी मी आणला. त्यामुळेच येत्या निवडणुकीत फलटण पालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार असून ज्या रामराजेंनी मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून स्वत:ची व स्वत:च्या बगलबच्च्यांची घरे भरण्याचा प्रयत्न केला, फलटण शहरासह तालुक्यातील जनतेला देशोधडीला लावले, त्या रामराजेंचे कारनामे अनेक आहेत. त्या रामराजेंना जेलमध्ये बसविण्यासाठी ते पुरेसे आहेत. परंतू या वयात हाफ चड्डीवर त्यांना मी जेलमध्ये बसवण्याची परिस्थिती येवू नये. रामराजेंनी खूप खालच्या थराला जावून राजकारण केले, मला अडचणीत आणण्यासाठी प्रचंड षडयंत्रे रचली. परंतू हा रणजितसिंह त्याला पुरुन उरला. भविष्यात तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही माझ्या विरोधात खासदारकी लढवून दाखवा किंवा माण विधानसभा मतदारसंघात उभे राहून निवडून येवून दाखवा. तुम्हाला चितपट केल्याशिवाय राहणार नाही. आ. जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार त्यांनी लहान नातींबरोबर व्हॉटसऍप स्टेटस् ठेवून आम्ही आता खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह आ. जयकुमार गोरे यांच्या सूचनाही मानतो, असे भविष्यात त्यांनी स्टेटस् ठेवावेत, असेही खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.
दरम्यान, या सभेमध्ये आ. जयकुमार गोरे यांनीही तुफान फटकेबाजी करत रामराजेंवर शरसंधान साधले. यांना घाटावरचा माणूस चालत नाही. परंतू हा घाटावरचा माणूस आता खाली आलेला आहे. सत्तेचा दुरुपयोग करीत तुम्ही भरपूर माज केला. पण आता हा माज चालणार नाही. कारण केंद्रात आणि राज्यात आमच्या विचारांचे सरकार आहे, असा टोलाही आ. गोरे यांनी रामराजेंना लगावला.
यावेळी फलटण पालिकेचे नगरसेवक अनुप शहा यांनीही रामराजेंसह त्यांच्या बंधूंवर टीका करीत तुफान हल्ला चढवला.
तालुक्यातील जनता व्याजासह हिशोब करणार!
रामराजेंच्या खानदानातील सगळ्यांना जेवढी मते नाहीत, तेवढी मते आणि मताधिक्य मला मिळालेले आहे. त्यामुळे भविष्यामध्ये माझा नाद करायचा असेल तर त्यांनी इथून पुढे स्वत:ची पात्रता तपासावी. गेल्या 30 वर्षामध्ये रामराजे आणि त्यांच्या खानदानीने संपूर्ण तालुका लुटून खाल्ला. आता त्याचा हिशोब करण्याची वेळ आलेली आहे. आगामी निवडणुकीमध्ये फलटण तालुक्यातील जनता त्यांचा व्याजासह हिशोब करणार आहे, असेही खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी साव्वाद सभेत बोलताना सांगितले.
सत्तेचा गैरवापर करुन डॉ. तासगांवकरांना देशोधडीला लावले
काही वर्षांपूर्वी फलटण तालुक्यातील बरड च्या माळरानावर तालुक्यातील चौथा साखर कारखाना सुरु होणार होता. कारखान्याबरोबरच त्याला पूरक असणारे अनेक उद्योग येणार होते. या कारखान्यामुळे फलटण तालुक्यातील हजारो युवकांना रोजगार तर मिळणारच होता, त्याचबरोबर तालुक्यातील बाहेर जाणार्या शेतकर्यांचा ऊसही या कारखान्याला जावून शेतकर्यांचा फायदा होणार होता. मात्र, जे काही मिळायला हवे, ते आम्हालाच… या लालसेपोटी रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सत्तेचा दुरुपयोग करुन तासगावकरांच्या कारखान्याला खो घातला. राजकीय हस्तक्षेप करुन तो कारखाना होवू दिला नाही. पर्यायाने डॉ. तासगावकरांनाही रामराजेंनी देशोधडीला लावून फलटण तालुक्यातील गरीब शेतकर्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान केले आहे.
रामराजेंना या वयात हाफ चड्डीवर जेलमध्ये बसवण्याची परिस्थिती येवू नये…
रामराजेंचे कारनामे अनेक आहेत. त्या रामराजेंना जेलमध्ये बसविण्यासाठी ते पुरेसे आहेत. परंतू या वयात हाफ चड्डीवर त्यांना मी जेलमध्ये बसवण्याची परिस्थिती येवू नये. रामराजेंनी खूप खालच्या थराला जावून राजकारण केले, मला अडचणीत आणण्यासाठी प्रचंड षडयंत्रे रचली. परंतू हा रणजितसिंह त्याला पुरुन उरला असा घणाघात खा.रणजितसिंह यांनी केला