महाराष्ट्र्र न्यूज प्रतिनिधी : मसूर
कराड – मसूर रस्त्यावरील रेल्वे फाटकातील दुरुस्तीचे काम असल्याने दिवसभर रेल्वे फाटक बंद ठेवण्यात आले. त्यामुळे वाहनधारकांची कसरत झाली तर काही वाहनधारकांना वाहतुक कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागला.
रेल्वे फाटक क्रमांक ९६ येथील आतील रुळाची दुरुस्ती, खडीकरण, भरावा आदी कारणांसाठी गुरुवारी सकाळी दहा वाजता ते रात्री आठ वाजेपर्यंत गेट बंद करण्यात आले. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नजिकच्या ग्रामपंचायती, पोलीस स्टेशन, कारखाने, प्रसारमाध्यमे यांना कळवण्याची आले होते .
परंतु सर्वांना माहिती नसल्याने अनेक वाहनचालकांची फसगत झाली. पर्यायी व्यवस्था म्हणून काही वाहनधारकांनी धुरुंगमळा ते उत्तर कोपर्डे मार्गाचा वापर केला. अरुंद रस्ता,एका बाजूला खोदण्यात आलेली चर, रेल्वे बोगदा व एकेरी वाहतूक असल्याने वाहनकोंडी होऊन वाहनधारकांना किरकोळ वादावादीच्या प्रसंगांना सामोर जावे लागले. वाहतुकीचा पल्ला वाढून वाहनांच्याही वर्दळीचा त्रास सोसावा लागला. वळणावर फलक नसल्याने वाहनधारकांची दिशाभूल झाली. मागील चार दिवसात झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने आधीच परवड झालेल्यांना आणखी मनस्ताप सोसावा लागला. रात्रीपर्यंत रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम सुरु होते