सातारा : शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावी आले होते. त्यांच्या भेटीसाठी कोयना धरणातील जलायशयामधून जात असताना भाजपाचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले आज चक्क बोट चालवली.
उदयनराजे भोसले यांना गाड्यांचीही फार आवड आहे. त्यांच्याकडे विविध गाड्यांचे खास कलेक्शन आहे. काही आठवड्यांपूर्वीच उदयनराजेंनी एका गाडीची टेस्ट ट्राइव्ह घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पहायला मिळाले होते.
सातारा नगरपालिका आणि जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या बाबत चर्चा करण्यासाठी उदयनराजे भोसले यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ घेतली होती. त्यानुसार आज सकाळी कोयना जलाशयातून उदयनराजे भोसले समर्थकांसह बोटीतून जात होते.
बोटीतून प्रवास करीत असताना बोट चालवण्याची त्यांना इच्छा झाली. त्यानंतर तात्काळ उदयनराजेंनी बोटीचं स्टेअरिंग स्वत:च्या हाती घेतले. त्यांनी पहिल्यांदाच बोट चालवली. त्यानंतर ते नगरविकसामंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले. दरे येथील शिंदे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन विविध विकासकामांबाबत चर्चा केली.