महावितरणकडून अन्याय , संपूर्ण क्षेत्र बाधित केल्याचा शेतकऱ्याचा आरोप
दहिवडी : ता.१४
माणमधील वडजल येथील एक शेतकरी स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करणार आहे.महावितरणने सदर शेतकऱ्यावर अन्याय केला असून शेतकऱ्यांच्या शेतात ट्रान्सफॉर्मर बसवल्याने संपूर्ण शेतकऱ्याचे क्षेत्र बाधित झाल्याने शेतकरी स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करण्यास प्रवृत्त झाला आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी सहाय्यक अभियंता म्हसवड ग्रामीण यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. मारुती पांडुरंग काटकर(रा.वडजल,ता.माण) या शेतकऱ्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महावितरण ने माझ्या शेतात बरोबर मध्येच ट्रान्सफॉर्मर बसवल्याने शेताचे संपूर्ण क्षेत्र बाधित झाले आहे. तो ट्रान्सफॉर्मर एका कोपऱ्यात बसवून घ्यावा, याबाबत महावितरण विभागाकडे मागणी केली असता त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून बसवून घ्यावा असे सुचवले आहे.
शेतकरी हा जिल्हा नियोजन समितीचा सदस्य नसतो त्याचे राजकीय कोणतेही संबंध नसतात असे असताना शेतकऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ट्रांसफार्मर बदलून घ्यावा, असे लेखी सांगणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या कीव येत आहे.
संबंधित शेतकऱ्यांनी वेळोवेळी महावितरणला याबाबत वारंवार सुचवून , कळवून देखील महावितरणने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने पांडुरंग काटकर यांनी स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर जनावरांसाठी गोठा करण्याबाबत लोखंड आणि पत्रा शेतात आणून संबंधित शेतकऱ्यांनी ठेवले होते मात्र ज्या गाडीतून ट्रान्सफॉर्मर घेऊन महावितरणचे कर्मचारी आले , त्याच गाडीतून त्यांनी लोखंड आणि पत्रा गायब केल्याचा आरोपही संबंधित शेतकऱ्याने यावेळी केला आहे.
ट्रान्सफार्मर बसवताना चोरीस गेलेले पत्रा आणि लोखंड हे साहित्य परत देण्यात यावे आणि ट्रान्सफॉर्मर शेतातून काढून तो शेताच्या एका कोपऱ्यात बसवावा,अशी मागणीही संबधित शेतकऱ्याने महावितरण आणि म्हसवड पोलिसांना दिलेल्या पत्रात केली आहे.