अमर रहे.. अमर रहे.. वीर जवान रोहिदास अमर रहे..या घोषात शनिवारी (ता.२३) धारपुडी (ता.खटाव )येथे वीर जवान रोहिदास फडतरे यांना शासकीय इतमात हजारो नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला. रोहिदास फडतरे यांच्या पार्थिवास मुलगा साहिल याच्या हस्ते भडाग्नी देत धार्मिक विधिनुसार शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व हजारोंच्या उपस्थितीत हा अंत्यविधी पार पाडण्यात आला.
रोहिदास फडतरे यांना जिल्हा पोलीस दलाच्या व भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने हवेत गोळीबाराच्या तीन फैरी झाडत मानवंदना दिली. तसेच माजी सैनिकांच्या वतीने देखील रोहिदास फडतरे यांना अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी रोहिदास फडतरे यांचे पार्थिव ग्वाल्हेरहुन पुणे येथे आणण्यात आले होते. पुण्यावरून लष्करा तर्फे रुग्ण वाहिकेच्या माध्यमातून त्यांचे पार्थिव धारपुडी येथील राहत्या घरी आणण्यात आले. रोहिदास फडतरे यांचे पार्थिव घरी काही काळ दर्शनासाठी ठेवली व नंतर पार्थिवाची लष्कराच्या गाडीतुन गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीसाठी लष्कराची गाडी फुलांच्या हराने सजवण्यात आली होती. तर संपूर्ण गावात रस्त्यावर सडा, रांगोळी करण्यात आली होती.
अंत्ययात्रा सुरू होताच मित्रपरिवार व सैनिक संघटनेच्या शिलेदारांनी रोहिदास यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी केली. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी विशेष सजावट करण्यात आली होती. शालेय विद्यार्थ्यांनी मिरवणुकीच्या पुढे रॅली काढत अमर रहे. अमर रहे..जवान रोहिदास अमर रहे..अशा घोषणा दिल्या. विद्यार्थी आणि नागरिकांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. सर्वच रस्त्यांवर पुष्पवृष्टी केली जात होती. ध्वनिक्षेपकावर देशभक्तिपर गाणी लावली होती. ‘भारत माता की जय, वीर जवान रोहिदास अमर रहे,’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. विरजवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो युवक, युवती, महिला व पुरुष रस्त्यांच्या दुतर्फा साश्रू नयनांनी उभे होते. रोहिदास यांच्या शेतात फुलांनी सजविलेल्या चबुतऱ्यावर अंत्यविधी पार पडला.
जवान रोहिदास यांच्या पार्थिवास विरपत्नी नीलिमा, कन्या डॉ.सानिया,मुलगा साहिल, भाऊ चंद्रकांत , कृष्णा खोरे महविकास मंडळाचे उपाध्यक्ष ना.महेश शिंदे,जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष प्रदीप विधाते,नायब तहसीलदार महेश गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम,सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, सातारा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सुभेदार चंद्रकांत पवार,जिल्हा सैनिक कार्यालयाचे कैलास जाधव,सरपंच अप्पासो पवार, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रणधीर जाधव,सैनिक संघटना अध्यक्ष कॅप्टन बबनराव धुमाळ,बबनराव चव्हाण, सैनिक संघटनेचे उत्तम करळे, प्रेमचंद जगताप, विविध गावचे आजीमाजी सरपंच,विविध संघटनेचे पदाधिकारी यांच्या वतीने पुष्पचक्र वाहत आदरांजली देण्यात आली.
शहीद जवान सुभेदार रोहिदास दादासो फडतरे यांचे प्राथमिक शिक्षण धारपुडी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण खटाव येथील श्री लक्ष्मी नारायण इंग्लिश स्कूल तर शहाजीराजे महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले होते. महाविद्यालयात शिकत असतानाच ते १९९८ मध्ये (ए एस सी) आर्मी सर्विस कोर बटालियन मध्ये भरती झाले होते. त्यांनी विविध ठिकाणी सेवा बजावली होती. याच गावच्या निलिमा जगताप यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना एक मुलगी व एक मुलगा असून सध्या ते सातारा येथे पत्नीसह राहत होते. मुलगी सानिया बी ए एम एस करत असून मुलगा साहिल दहावीत असून स्केटिंग मध्ये नॅशनल खेळाडू आहे.
शहीद जवान रोहिदास फडतरे सध्या भोपाळ (मध्यप्रदेश) येथे सेवा बजावत होते. सध्या त्यांची प्रकृती ठीक नव्हती. बरेली येथील आर्मी हाॅस्पीटल मध्ये उपचार सुरू होते. येथेच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
रोहिदास यांच्या निधनाची वार्ता कळताच मित्रपरिवार आणि गावकऱ्यांना दु:ख अनावर झाले होते. जवान रोहिदास यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, भाऊ ,भावजय, पुतणे असा परिवार आहे.
जवान रोहिदास यांचे पार्थिव घरी येताच विरपत्नी नीलिमा, कन्या सानिया,मुलगा साहिल व कुटुंबातील इतर सदस्यांनी एकच टाहो फोडला होता. पार्थिव घरात येताच. हे काय केलं रे देवा असा टाहो विरपत्नी नीलिमा यांनी फोडला . त्यांचा हा टाहो बघून उपस्थितांना देखील अश्रू अनावर झाले.