महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी –
खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड तालुक्यातील पार्ले गावास जोडणा-या नवीन पुलासाठी 2 कोटी 50 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. तशी माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आली असून या पुलामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षित वाहतूकीचा प्रश्न संपुष्टात येणार आहे.
कराड शहरालगत असणा-या पार्ले गावच्या परिसरात दिवसेंदिवस रहदारी वाढत चालली आहे. येथे इंजिनिअरिंग कॉलेज असून छोट्या मोठ्या उद्योग धंद्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी येथे दळणवळण वाढल्याने रस्त्यावर गर्दी होत आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सध्या या गावाला जोडणारा 50 वर्षापूर्वीचा जुना पूल असून तो वहातुकीसाठी धोकादायक बनला आहे. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीत हा पूल पाण्याखाली गेल्याने पुलाचे नुकसान झाले होते. याशिवाय पूल अरुंद असल्यामुळे एका वेळी दोन वहानांना पुलावरून प्रवास करताना अडथळा येत आहे.
यासंदर्भात येथील अशोकराव पाटील- पार्लेकर, सरपंच बाळासाहेब नलवडे, प्रकाश पाटील, संपतराव नलवडे, तानाजी नलवडे, भगवान पाटील व राहुल पाटील आदी ग्रामस्थांनी खा. श्रीनिवास पाटील व पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली होती. गेल्या वर्षी महापूर आल्याने पुलाचे नुकसान झाले असून येथे नवीन मोठा पूल बांधण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत खा. श्रीनिवास पाटील यांनी हा पूल होणे आवश्यक असून त्यासाठी निधी मंजूर करण्याचे बांधकाम विभागाला सुचविले होते. तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्याशी संपर्क साधून या पूूलासाठी निधी मंजूर करण्याची विनंती त्यांनी केली होती. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्प 2020-21 मधून सातारा लोकसभा मतदारसंघातील या पुलाच्या बांधकामासाठी 2 कोटी 50 लाख रूपायांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तशी माहिती बांधकाम विभागाने खा. पाटील यांना पत्राद्वारे कळविलेली आहे. दरम्यान कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्यानंतर या पुलाच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होणार आहे.