सातारा दि. 18 :जिल्ह्यामध्ये यंदा पेरणीला पुरक पाऊस झाल्याने पेरणी खरिपाच्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे गतवर्षी जूनच्या अखेरीस ६ टक्के असलेले पेरणीचे क्षेत्र यंदाच्या वर्षी मात्र जूनच्या मध्यातच ३० टक्क्यांच्या जवळ पोहोचले आहे. ते भात ज्वारी भुईमूग सोयाबीन आदी पिकांचा समावेश आहे. जून च्या अखेरपर्यंत जिल्ह्यातील पेरणी ची सर्व कामे पूर्ण होतील असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.
मागील काही दिवसांमध्ये मान्सून पूर्व आणि मान्सूनच्या पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याने आपल्या पारंपरिक खरीप पिकांच्या पेरणीची कामं हाती घेतली आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत पाटण तालुका अग्रेसर असून येथे सर्वाधिक ७३ टक्के पेरणीची काम पूर्ण झाले आहेत. तर माण तालुक्यात सर्वात कमी म्हणजेच केवळ ०.२५ टक्केच पेरणी झाली आहे.
यावर्षी कोरोना आणि लाॅकडाऊन अशा दुहेरी संकटांना तोंड देत असताना शासनाने शेती आणि शेतकऱ्यांवर मात्र याचा कोणताही परिणाम होवू दिलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावरच खत आणि मागणी केलेले बियाणं उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे कोरोनाचा कोणताही फटका शेतीसंबंधीत कामांना बसलेला नाही.
सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यातील भाताच्या ४९ हजार हेक्टर क्षेत्रापैकी २२ हजार हेक्टरवरील पेरणी पूर्ण झाली आहे. तर ज्वारीच्या पिकाचीही ५० टक्के भागावरील पेरणी झाली आहे. त्यासोबतच सोयाबीन आणि भुईमूग या दोन्ही पिकांची प्रत्येकी ४३ टक्के पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत.
गतवर्षी जूनचा शेवटचा आठवडा संपला तरी माॅन्सूनचे आगमन झाले नव्हते. त्यामुळे पेरणीची आणि शेतीशी संबंधित सर्व कामे रखडली होती. जून अखेरीस ही केवळ ६ टक्केच पेरणी पुर्ण झाली होती. यावर्षी मात्र जून अखेर पर्यंत पेरणीशी संबंधित कामे पुर्ण होण्याचा अंदाज आहे.