“पाकिस्तानपेक्षा चीन हा भारताचा मोठा शत्रू आहे, हे माझं मागील अनेक वर्षांपासूनचं मत आहे. लांब पल्ल्याच्या दृष्टीने विचार केल्यास आपल्या हितासंदर्भात खरं संकट निर्माण करण्याची ताकद, दृष्टी आणि कार्यक्रम फक्त चीनचा आहे,” असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. पवारांच्या ‘एक शरद सगळे गारद’ या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रदर्शित झाला. शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली, या मुलाखतीत शरद पवार यांनी हे मत व्यक्त केलं.
करोनासोबतच भारतासमोर आणखीन एक संकट आहे आणि ते म्हणजे चीनचं तर यासंदर्भात तुमची भूमिका काय आहे, असा प्रश्न राऊत यांनी पवारांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी चीन प्रश्नाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन वेगळा असल्याचे सांगितले. “चीन प्रश्नाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन वेगळा कारण सामान्यपणे आपला विरोधक कोण किंवा शत्रू कोण याचा विचार करतो तेव्हा भरतीय मनात पहिल्यांदा पाकिस्तान येतो.
मागील अनेक वर्षांपासून माझं मत आहे की पाकिस्तानपासून आपल्याला खरी चिंता नाहीय. पाकिस्तान आपल्या विचाराचा नाही, तो आपल्या हिताच्याविरोधात पावलं टाकतो हेही खरं आहे. मात्र लांब पल्ल्याच्या दृष्टीने विचार केल्यास आपल्या हितासंदर्भात खरं संकट निर्माण करण्याची ताकद, दृष्टी आणि कार्यक्रम फक्त चीनचा आहे. चीन हे आपल्या देशासमोरील मोठं संकट आहे. चीन हे संकट असल्याने चीनपासून आपल्या देशाला होणारा उपद्रव हा साधासुधा नाही. पाकिस्तानची लष्करी शक्ती आणि चीनची लष्करी शक्ती यात जमीन आस्मानाचा फरक आहे,” असं पवार यांनी सांगितलं. तसेच शस्त्र आणि लष्कराच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास चीन विरुद्ध भारत दहाला एक या प्रमाणात गुणोत्तर असल्याचंही पवारांनी सांगितलं.
चीनसंदर्भात बोलताना संरक्षण मंत्री म्हणून १९९३ साली चीनमध्ये गेलो होतो तेव्हाच चीनला महसत्ता होण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचा एक अनुभवही पवारांनी या मुलाखतीमध्ये शेअर केला. चीन मागील २० वर्षांपासून महासत्ता होण्यासाठी झटत आहे. आता चीनकडे आर्थिक पाठबळ आलं आहे तर तो भारताकडे पाहत असल्याचे पवारांनी म्हटलं आहे.