पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी / खटाव : (संतोष सुतार)
खटाव तालुक्यातील खातगुण येथील पत्रकार व भारतीय मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष युवराज गायकवाड यांना मारहाण करणे, शिवीगाळ व दमदाटी केल्या प्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पुसेगाव पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, खातगुण ग्रामपंचायतीमध्ये कालभाय्य शिक्याचा वापर करून महसुलचा भ्रष्टाचार होत असल्याचे दिसून येत असल्याने ग्रामपंचायत सदस्यांनी चौकशीची मागणी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडे केली होती. त्यानुसार जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने खटाव पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले होते. दि.16 रोजी विस्तार अधिकारी माने, ग्रामसेवक जाधव, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ खातगुण ग्रामपंचायत कार्यालयात चौकशीसाठी गेले होते. कार्यालयाची चौकशी चालू असताना ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्यात गदारोळ सुरू झाला असता पत्रकार गायकवाड यांनी त्यांच्या मोबाईलने सदर प्रकाराचे चित्रीकरण करण्यास सुरू केले. याचवेळी माजी तंटामुक्ती अध्यक्ष सीताराम रामदास लावंड यांनी गायकवाड यांचा मोबाईल ओढून घेतला व दमदाटी, शिवीगाळ करत लथाबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर सीताराम लावंड यांनी त्यांचा मुलगा अमित लावंड याला कार्यालयाच्या बाहेर बोलावून घेतले. गायकवाड हे कार्यालयातून बाहेर आले असता गावातील ग्रामस्थांच्या समोर सीताराम लावंड व अमित लावंड यांनी गायकवाड यांना पुन्हा लथाबुक्यांनी मारहाण केली व हा गावात कसा राहतोस तेच बघतो असे म्हणाले. या मारहाणीत गायकवाड यांच्या चेहऱ्यावर, पोटात, छातीवर व पायाला मार लागला आहे.
पुसेगाव पोलीसांनी सीताराम रामदास लावंड व अमित सीताराम लावंड यांच्यावर दमदाटी, शिवीगाळ व मारहाण करणे तसेच पत्रकार संरक्षण कायदा 2019 चे कलम 4 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बी बी महामुनी करीत आहेत.