महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :फलटण
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी, कर्मचारी ,संगणक परिचालक, ग्रामपंचायत कर्मचारी ,तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असलेले कंत्राटी पद्धतीवरील कर्मचारी, कामगार यांना 30 सप्टेंबर 2020 पर्यंत 50 लाख रुपयापर्यंत विमा कवच सशर्त देण्यात आलेले आहे.या बाबत शासनाने नुकतेच एक परिपत्रक काढले आहे.
त्यानुसार सदर कर्मचारी त्याच्या इस्पितळात दाखल होण्याच्या अथवा मृत्युच्या दिनांका पूर्वी 14 दिवसांच्या काळात कर्तव्यावर हजर असला पाहिजे आणि ही बाब जिल्हाधिकारी अथवा अन्य कोणत्याही पदनिर्देशित विभाग प्रमुख इत्यादी यांचेकडून सत्यापित प्रमाणित करण्यात येईल. तसेच सदर मृत्यू कोविड 19 शी संबंधित असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र शासकीय अथवा ग्रामीण रुग्णालय ,आर सी एम आर, नोंदणीकृत खाजगी इस्पितळ,प्रयोगशाळा यांचेकडून प्राप्त अहवालाच्या आधारे करण्यात येईल. तसेच इतर बाबी संदर्भात 31 मार्च 20 रोजी चे परीपत्रकाप्रमाणे लागू राहतील असे आदेश शासनाने निर्गमित केले आहेत.

यापूर्वी ग्रामपंचायत स्तरावर सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मदतनीस ,अशा कार्यकर्त्या तसेच जिल्हा परिषद आस्थापनेवरील ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी सी एस सी कंपनीचे केंद्रचालक यांना एप्रिल मे जून 2020 या तीन महिन्यांमध्ये 25 लाख रुपयांचे विमा कवच दिले होते शासनाच्या वित्त विभागाने शासनाचे कर्मचारी तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने अंगणवाडी सेविका ,मदतनीस, आशा, प्रवर्तक यांना 50 लाखाचे विमा कवच दिले आहे. परंतु ग्राम विकास विभागाचे जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी संगणक परिचालक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असलेले कंत्राटी पद्धतीवरील कर्मचारी, कामगार यांनाही विमा कवच देण्यात आलेले नव्हते. सदर कर्मचारी हे या कोरोनाच्या महामारी मध्ये घरोघरी जाऊन जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना शासनाने विमा कवच लागू केले आहे सध्याच्या परिस्थितीत ठामपणे उभा राहून सर्वांची काळजी घेऊन कोरोना वर विजय मिळवण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे या निर्णयातून जाणवते.






















