महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी
ज्या शिक्षकांच्या सेवा कोविड -19 महामारीच्या प्रतिबंधात्मक कामकाजासाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत त्यांना कार्यमुक्त करण्यात यावे. संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून त्याबाबतची कार्यवाही करावी असा आदेश काढण्यात आलेला आहे.
कोरोना महामारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेत सहभागी करून घेण्यात आलेल्या शिक्षकांना त्यातून मुक्त करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच अतिरिक्त ठरलेल्या ज्या शिक्षकांना कोणत्याही आस्थापनेवर समायोजित करण्यात आलेले नाही त्यांना ते राहत असलेल्या ठिकाणाच्या जवळच्या शाळेत बोलावून ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत त्यांचा उपयोग करून घ्यावा असे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी ज्या शिक्षकांची उपस्थिती आवश्यक आहे त्यांना आठवड्यातून एक किंवा दोन दिवस शाळेत बोलाविण्यात यावे. मात्र एकाच दिवशी सर्व शिक्षकांना बोलावू नये अशा सूचना देण्यात आल्या होत्या . दरवर्षी 15 जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होते. परंतु यावर्षी कोरोनाच्या जागतिक महामारी मुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.मात्र ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.