मुळगाव प्रतिनिधी:(श्रीगणेश गायकवाड):
पाटण तालुका म्हणजे पावसाचा प्रदेश असे समजले जाते.पाथरपुंज,नवजा,कोयना अशा भागात तर सर्वाधिक पावसाची नोंद होते. अशा वेळेस धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले की खबरदारीचा उपाय म्हणून कोयना धरणातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू होतो आणि पाण्याचा विसर्ग वाढविला असता कोयना नदीवरील असणारे पूल यांना जलसमाधी मिळते.
दरवर्षी संगमनगर धक्का पूल, नेरळे पूल, मुळगाव पूल, निसरे फरशी पूल हे पावसाळ्यात पाण्याखाली जावून शेकडो गावांचा संपर्क तुटत होता परंतु काही वर्षांपूर्वी संगमनगर व निसरे या ठिकाणी नवीन उंच पूल बांधून तेथील लोकांची सोय करण्यात आली परंतु मुळगाव पुलाची उंची मात्र अजून वाढविण्यात आली नाही याबद्दल मुळगाव व आसपासच्या गावातील लोकांच्या मध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.मुळगाव,त्रिपुडी,चोपडी,कवरवाडी,बेलवडे अशा गावांना पाटण तालुक्याशी जोडणारा मूळगाव पूल दरवर्षी पाण्याखाली जात असतो पावसाळा संपल्यानंतर त्याची अवस्था म्हणजे जागोजागी खड्डे पडलेले असतात कठड्याचे रेलिंग तुटलेले असते अशा अवस्थेत पाहायला मिळत असतो या मुळगाव पुलावरून लहान शाळकरी मुले यापासून ते वयोवृद्ध ग्रामस्थ रोज ये-जा करत असतात.
मागील वर्षीच्या महापुराने सर्वांचीच बिकट अवस्था करून ठेवली होती त्यातच मूळगाव पूल हा सलग दहा ते पंधरा दिवस पाण्याखाली होता पूर ओसरल्यानंतर पुलाची अवस्था फारच दयनीय होती. पुलाच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पाहायला मिळत होते. त्याचबरोबर या पुलाचे कठडे तुटलेले होते व त्याच्या पाईप या वाहून गेल्या होत्या. त्यामुळे मुळगाव पुलावर छोटे-मोठे अपघात सतत होत होते याचा गांभीर्याने विचार करून मुळगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व ग्रामस्थ तानाजी खाडे, गणेश मोळावडे, शिवाजी मोळावडे (चेअरमन), उत्तमराव सुपुगडे, दीपक गायकवाड, अमित सुपुगडे, लक्ष्मण कळके,जगन्नाथ मोळावडे,बुवा चव्हाण यांनी पाटणचे तहसीलदार तसेच पाटण पंचायत समिती सभापती यांच्यासह सर्व प्रशासकीय प्रमुखांना मुळगाव पुलाची डागडुजी करावी व मुळगाव पुलाची उंची वाढविण्यात यावी याबद्दल निवेदन दिले होते. याबाबत विविध प्रसारमाध्यमांनी सुद्धा आवाज उठविला होता याची दखल घेऊन पावसाळा सुरू होण्याअगोदरच मुळगाव पुलाची डागडुजी करून पुलाच्या कठडयाचे रेलिंग नवीन तयार करून, नवीन पाईप बसवल्या,पुलावरील खड्डे भरले आहेत. याबाबत वाहनचालक व मूळगाव आणि आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत परंतु असे असले तरी अजूनही मुळगाव पूल व्यवस्थित झाला आहे असे पाहायला मिळत नाही
आज सुद्धा पुलावरून चारचाकी वाहन जात असताना पुलाला हादरे बसत आहेत तसेच दरवर्षी पावसाळ्यात कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला असता मुळगाव पुल हा निश्चितपणे पाण्याखाली जात असतो यावर प्रशासनाने ठोस उपाययोजना करून मुळगाव पुलाची उंची वाढवावी अशी मागणी आता जोर धरत आहे त्याच बरोबर दैनिक महाराष्ट्र न्यूज चॅनेल व इतर प्रसारमाध्यमांनी हे वृत्त प्रसिद्ध केल्यामुळे पूल वेळेत दुरुस्त करण्यात आला याबद्दल मुळगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व ग्रामस्थ वाहन चालक यांनी धन्यवाद दिले परंतु या तात्पुरत्या डागडुजी ऐवजी मुळगाव पुलाची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी आता जोर धरत आहे.
दरवर्षी मुळगाव पूल किमान आठ दिवस तरी पाण्याखाली जात असतो त्यावेळी एखादी व्यक्ती जर आजारी पडली तर पाटण येथे दवाखान्यात घेऊन जाताना फार अडचण निर्माण होते. त्यापेक्षा जर पुलाची उंची वाढवली तर पूल पाण्याखाली जाणार नाही व दरवर्षी होणारे पुलाचे नुकसान होणार नाही बुवा चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य मुळगाव