महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
बारामती लोकसभा मतदार संघाच्या बहुतांश भागात रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या सर्व शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना याबाबत सूचना केली असून तसे लेखी पत्रही पाठवले आहे. बारामतीसह इंदापूर, दौंड, पुरंदर आणि खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या ग्रामीण भागात रविवारी (दि. ६) वाऱ्या वादळासह मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. या पावसामुळे शेकडो एकर शेतीतील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दैनंदिन बाजारात जाणाऱ्या भाज्या, फुले, फळे अशा पिकांचे यात प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या आस्मानी संकटाने काढून घेतला आहे. एकीकडे कोरोनाचे संकट असताना पावसाने या नुकसानीत आणखी भर टाकली आहे, याचा।विचार करून तातडीने या सर्व भागातील नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी या पत्राद्वारे केली आहे.