महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :(लोणी भापकर)
बारामती तालुक्यातील पळशी मोराळवाडी सीमेवर असणारा पाझर तलाव गेल्या दोन – तीन दिवसात झालेल्या जोरदार पावसाच्या पाण्याने फूटला असुन मोठया प्रमाणात पाणी वहात असल्याने ओढ्याला पूर आला आहे.
सदर पाझर तलाव जिल्हा परिषदच्या छोटे पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येत असून 1972 च्या दुष्काळात ह्या पाझर तलावाची निर्मिती रोजगार हमी योजनेतून झाली आहे.
सदर पाझर तलावाची दुरुस्ती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सन 2012 -13 साली झाली होती. या तलावामुळे पळशी,मोराळवाडी परिसरातील बंडगरमळा, मळई, कराडमळा, येथील शेतकऱ्यांना या पाझर तलावाचा चांगल्या प्रकारे फायदा होतो.
हा पाझर तलाव फुटला असल्याचे समजताच पळशी येथील सरपंच बाबासाहेब चोरमले व मोराळवाडीचे सरपंच निलेश मासाळ, यांनी या पाझर तलावावर जाऊन त्या ठिकाणची पाहणी केली व हा पाझर तलाव लवकर दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
































