महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : (पाचगणी)
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे बदली झालेले अभियंता प्रवीण चवरे यांची पुन्हा सातारा येथे बदली करावी अशी मागणी महू धरणातील पूर्ण बाधित वहागाव (ता.जावली) येथील ग्रामस्थांनी ऐका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात पुढे म्हंटले आहे की प्रवीण चवरे हे कर्तव्य दक्ष व सक्षम अधिकारी असून त्यांना धरणग्रस्तांच्या प्रश्नांची जाण आहे. १९९६ पासून आजपर्यंत या महू धरणातील सर्व प्रश्नांची माहिती आहे. त्यांनी धरणग्रस्तांचे प्रश्न व धरण पूर्ण करण्यास चांगल्याप्रकारे लक्ष दिले आहे.
या अधिकाऱ्याची विनाकारण बदली केली असून त्यांच्या बदली मागचे गौडबंगाल कळायला हवे. श्री.चवरे साहेब आज धरणग्रस्तांच्या प्रत्येक माणसाच्या ओळखीचे झाले होते. प्रत्येक खातेदाराला प्रत्यक्ष भेटून त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे प्रत्येक खातेदाराला ते जवळचे वाटत होते.अद्यापही बऱ्याच धरणग्रस्तांचे प्रश्न सुटलेले नाहीत आता नवे अधिकारी येणार त्यांना या प्रश्नांची ओळख होण्यातच वेळ जाणार यामुळे चावरे साहेबांच्या बदलीमुळे हे प्रश्न लोंबकळत राहणार की काय अशी भीती आता धरणग्रस्तांना वाटू लागली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याची बदली पुन्हा सातारा येथे करावी अशी मागणी या निवेदनात शेवटी केली आहे.यावर सरपंच अरुण रांजणे ,ज्ञानेश्वर रांजणे , अहिरे गावचे गट प्रमुख प्रकाश रांजणे, दत्तात्रय रांजणे अजूनज गावचे लक्ष्मण रांजणे, संपत रांजणे व वहागाव ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

































