परीक्षा केंद्रावर मास्क, हातमोजे आणि सॅनिटायझर बॉटल देण्यात येणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) करोना पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचना दिल्या आहेत. उमेदवाराला तीन पदरी कापडाचा मास्क घालणे अनिवार्य केले आहे. तसेच, उमेदवाराला परीक्षा केंद्रावर मास्क, हातमोजे आणि सॅनिटायझरची लहान बॉटल असलेले एक किट देण्यात येणार आहे. त्याचा वापर उमेदवारांनी दोन्ही सत्रांसाठी करणे बंधनकारक आहे.
‘एमपीएससी’मार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबरला, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 1 नोव्हेंबरला, तर दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 22 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी हजारो उमेदवारांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर उमेदवारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी स्वच्छता तसेच आरोग्यास हितावह वातावरण राखण्यासाठी हात सतत सॅनिटाइझ करणे आवश्यक आहे.
करोनाची लक्षणे जसे ताप, सर्दी, खोकला इत्यादी दिसून येत असल्यास संबंधित परीक्षा उपकेंद्रावरील पर्यवेक्षकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांना आगाऊ कळवावे, अशाही सूचना ‘एमपीएससी’ने दिल्या आहेत. करोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य सरकार तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवेळी जाहीर केलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे स्पष्ट केले.
आयोगाकडून उमेदवारांना सूचना
- सर्वांना ‘आरोग्य सेतू’ ऍप अनिवार्य
- उमेदवाराने अल्पोपहार व पाण्याची बाटली सोबत आणावी
- दोन पेपरच्या मधल्या वेळामध्ये बाहेर जाण्यास मनाई
- एकमेकांचे पेन, लिखाण साहित्य वापरण्यास मनाई
- सुरक्षित अंतर राखणे उमेदवारांना अनिवार्य