महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (इंदापूर): शहाजीराजे भोसले
पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुका कोरोना मृत्यू दराच्या बाबतीत ग्रामीण भागात सहावा तर शहरी भागात दुसरा आहे. त्यामुळे मृत्यू दर कमी करण्यासाठी अधिकारी प्रशासन व नागरिकांनी समन्वय ठेवून काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी कुठलाही प्रकारचा गाफीलपणा नको. यापुढील काळात इंदापूर तालुक्यात लाॅकडाऊन निश्चितपणे होणार नाही. मात्र नागरिकांनी सावध रहाणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दि .१८ सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृहात आढावा बैठकीत केले.
यावेळी सिव्हिल सर्जन अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, उपविभागीय कार्यकारी दंडाधिकारी दादासाहेब कांबळे, बारामती पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगांवकर, तहशिलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी विजयकुमार परिट, नगराध्यक्षा अंकिता शहा, मुख्याधिकारी डाॅ.प्रदिप ठेंगल, वैद्यकीय अधिक्षक डाॅ. एकनाथ चंदनशिवे,डाॅ.सुहास शेळके, डाॅ.मिलिंद खाडे, इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, वालचंदनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, भिगवणचे जीवन माने, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतापराव पाटील, पोपट शिंदे, स्वप्नील राऊत, दादासाहेब सोनवणे, बाळासाहेब ढवळे, संजय दोशी, अशोक मखरे, सागरबाबा मिसाळ आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री भरणे पुढे म्हणाले कि ,वालचंदनगर सेंटर सोमवार पासून सुरू करणार असून भिगवण येथे सेंटरलाईज ऑक्सिजन व्यवस्था दोन दिवसात सुरू करणार आहे. निमगांव केतकी व इंदापूर कोरोना सेंटरमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत .सध्या इंदापूर तालुक्यात एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या १७९६ इतकी असून यापैकी ७२५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १००५ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ६६ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.