सातारा : केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुशिक्षित तसेच कुशल बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी विविध माध्यमातून द्वार खुले आहे. सातारा जिल्हा ही माझी जन्मभूमी असल्यामुळे सातारा जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी यशस्वी प्रयत्न करणार, अशी ग्वाही राष्ट्रीय नागरी व पर्यावरण संरक्षण संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा प्रशासकीय संचालक विजयराजे ढमाळ यांनी सातारा येथील ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिली.
दुष्काळी भाग असणार्या खंडाळा तालुक्यातील असवली गावचे सुपूत्र असलेल्या विजयराजे ढमाळ यांनी आपल्या कर्तबगारीवर अनेक युवकांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहित केले. एकेकाळी खंडाळ्यात कुसळ उगवत नव्हते, त्याठिकाणी औद्योगिकीकरण झालेले आहे. त्यामुळे परिसरात आर्थिक सुबत्ता येवून युवकांच्या हाताला काम मिळाले आहे. सातारा जिल्ह्यातील परिश्रम घेणार्या युवकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. संस्थेच्या माध्यमातून पर्यावरणपुरक व्यवसायनिर्मिती, हे उद्दिष्ट आहे.
कोरोना महामारीमुळे अनेकांचा रोजगार गेला, ही वस्तुस्थिती असली तरी त्याच्या दुप्पट वैद्यकीय क्षेत्रात रोजगार उपलब्ध झाला आहे. आज व्हेंटिलेटर, ऑक्सिजनला मोठी मागणी आहे. जिल्ह्यात हा व्यवसाय उभारणीसाठी नवउद्योजक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांनी या क्षेत्राकडे धाव घेतली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.