महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी/कोरेगाव : कोरोना प्रतिबंधात्मक नियम व उपायांचे सक्तीचे पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाने उठवलेल्या आवाजाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत जिम सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे युवा मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्रावण जंगम यांनी सांगितले.
यावेळी बोलताना श्रावण जंगम म्हणाले कि, भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातून युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत राज्यातील जिम चालू करण्याची मागणी केली होती. तसेच उद्या राज्यभरातून युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांनी जिम चालू करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. सातारा जिल्ह्यात देखील जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ते आंदोलन करणार होते, मात्र याच इशाऱ्याची दखल घेत आंदोलनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरु करण्याची घोषणा केल्याने युवा मोर्च्याच्या मागणीला यश मिळाले आहे. त्यामुळे उद्याचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.