मुंबई, दि. 15 : रणजितसिंह डिसले यांना मिळालेला ग्लोबल टीचर पुरस्कार हा राज्यासह देशाचा गौरव आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन शिक्षण क्षेत्रात त्यांच्या संकल्पनांचा समावेश केला जाईल, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
विधानपरिषदेत रणजितसिंह डिसले यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना सभापती रामराजे नाईक-निंबाळकर बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब, सदस्य विक्रम काळे यांनी या अभिनंदनाच्या प्रस्तावास पाठींबा दिला.
यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी श्री.डिसले यांनी क्यूआर कोडची अभिनव संकल्पना राबवून शैक्षणिक क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बदल घडवून आणल्याचे सांगितले.
मंत्री ॲड.अनिल परब म्हणाले, रणजितसिंह डिसले यांना मिळालेला पुरस्कार हा राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन, या संकल्पनेचा शिक्षण क्षेत्रात वापर करुन अभ्याक्रमाचा दर्जा उंचविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही ॲड.परब यांनी सांगितले.