मुंबई : राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता बारावीच्या परीक्षा देखील रद्द झाली आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या संदर्भात चर्चा झाली. बारावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव मंजूर झाला असल्याची माहिती मिळाली आहे. काल मंत्रिमंडळ बैठकीत 12 ची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला जाईल. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं.
कोविड परिस्थितीत परीक्षा घेणे शक्य नसल्याची मागणी केंद्राकडे केल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली होती. काल झालेल्या बैठकीत 12 वीच्या परीक्षेसंदर्भात चर्चा झाली. 12 वीची परीक्षा मे एंडपर्यंत पुढे ढकलली होती. मात्र आता कोविडच्या प्रभावामुळं 12 वीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात चर्चा झाली. आम्ही आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे प्रस्ताव पाठवणार आहोत. त्यानंतर आम्ही बैठक घेऊन निर्णय घेणार आहोत, असं गायकवाड म्हणाल्या होत्या. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर याआधीच राज्यातील दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. केंद्र सरकारने बारावीच्या परीक्षा रद्द केल्यावर राज्य सरकारही बारावीची परीक्षा रद्द करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं होतं.
सीबीएसई पाठोपाठ आयएससी 12 वी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. निकाल कसा लावणार याबाबत निर्णय लवकरच होणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याची महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काल झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल राज्य व इतर तज्ज्ञांशी विस्तृत चर्चा केली, त्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मुलांची सुरक्षा आणि आरोग्य ही प्राथमिकता आहे. अशा वातावरणात मुलांना ताण देणे योग्य नाही. मुलांचे जीवन धोक्यात घालू शकत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं. सीबीएसई परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेण्यात आला आहे. आमच्यासाठी विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि या पैलूवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये चिंता आहे, ती संपवली पाहिजे. अशा तणावग्रस्त परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेस भाग घेण्यास भाग पाडले जाऊ नये म्हणून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं.