पाटण प्रतिनिधी : लेक लाडकी अभियान अंतर्गत त्रिपुडी या गावामध्ये आपत्ती व्यवस्थापन यावर कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून लेक लाडकी अभियान च्या अॅड. वर्षाताई देशपांडे, प्रा. संजीव बोंडे हे उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून त्रिपुडी गावच्या सरपंच सौ. नंदा भरत पाटील, उपसरपंच राहुल देसाई, डॉ. योगिता सूर्यवंशी व लेक लाडकी अभियानचे कार्यकर्ते जनार्दन पवार होते.
कार्यशाळेच्या सुरुवातीला प्रमुख मार्गदर्शक यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर उपसरपंच राहुल देसाई यानी थोडक्यात पाहुण्याचा परिचय करून दिला. आपत्ती व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन करताना प्रा. संजीव बोंडे म्हणाले कि आपत्ती व्यवस्थापन आणि लोकांचा सहभाग ह्यांच नातं फार जवळच आहे. मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित असे आपत्तीचे दोन प्रकार आहेत. भूकंप, महापूर, चक्रीवादळ अतिवृष्टि ह्या सर्व घटना नैसर्गिक आपत्तीमध्येच मोडणाऱ्या आहेत. अशा आपत्तीमध्ये होणारी जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी महाराष्ट्र आपत्ती जोखीम व्यवस्थापना अंतर्गत विभागीय व जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर केंद्र शासनाने २००५ मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा पारित केला आहे. याचा मूळ उद्देश नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारे नुकसान टाळणे व सर्वांना सुरक्षितता प्रदान करणे हा आहे. हा कार्यक्रम प्रशासकीय यंत्रणेकडून राबविला जात असला तरी देखील संकटकालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी लोकसहभागही तितकाच महत्वाचा आहे.
त्यानंतर वर्षाताई देशपांडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाल्या कि गावात येणारे महापूर वा अन्य नैसर्गिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी सुरुवातीला गावकऱ्यांनाच हिमतीने सज्ज राहावे लागते. नागरिकांचे मनोबल वाढविण्यासाठी स्थानिक पातळीवर व्यवस्थापनाची गरज निर्माण होते.दरवर्षी सातत्याने येणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी, अकस्मात येणाऱ्या आपत्तींना तोंड देण्यासाठी, अज्ञान तसेच माहितीचा अभाव यामुळे होणारी हानी टाळण्यासाठी, कमीत कमी जीवित व वित्त हानी होईल याची खात्री करण्यासाठी आपत्तीला सहज बळी पडणाऱ्या वर्गाचे रक्षण करण्यासाठी, आपत्तीनंतर दैनंदिन जीवन उध्वस्त होऊ नये याची तयारी करावी लागते. आपत्ती काळात तसेच आपत्तीनंतर विशेषत: अल्पवयीन बालके, वृध्द, महिलां तसेच अपंग यांना कमीत कमी त्रास होईल याची खातर जमा करण्यासाठी याशिवाय आपत्ती काळात पाणी पुरवठा, जनावरांना चारा, खानपान व्यवस्था, वैद्यकीय सेवा, औषध सामग्री, सांडपाण्याची व्यवस्था इत्यादी सुरळीत चालतील. याची खात्री करण्यासाठी स्थानिक पातळीवर आपत्ती व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी तितकाच उत्स्फूर्तपणे लोकसहभाग मिळणे आवश्यक ठरते.
कार्यशाळेच्या शेवटी त्रिपुडी ग्रामपंचायतीला मिळालेले आपत्ती व्यवस्थापनाचे साहित्य याचे थोडक्यात माहिती देण्यात आली. या कार्यशाळेसाठी त्रिपुडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय देसाई, याचबरोबर भरत पाटील,सखाराम पवार, शिवाजी देसाई, संजय देसाई, सुनयना पवार, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका नंदा भोळे यांच्यासह गावातील लोक व स्वयंसेवक उपस्थित होते सदर कार्यशाळा ही कोरोनाचे सर्व नियम पाळून घेण्यात आली.