गोरख नारकर : पाटण येथील मनसेच्या उपोषणाचा 3रा दिवस , अनेकांचा वाढता पाठींबा
पाटण : कराड-चिपळूण या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने पाटण तालुका विकासहीन झाला आहे. २ वर्षे होऊनही हे काम पूर्णतः बंद केले आहे. वेळोवेळी आवाज उठवला मात्र त्याची योग्य दखल संबंधितांनी न घेतल्याने तालुक्यातील जनतेच्या हक्कासाठी उपोषण सुरू केले आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी व कंपनीचे लागेबांधे असल्यानेच महामार्गाच्या रस्ताची वाट लागली असल्याचा आरोप मनसेचे पाटण तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांनी केला आहे.
पाटण तहसिलदार कार्यालयासमोर सुरू असलेल्या मनसेच्या आमरण उपोषणाच्या बुधवारी तिसऱ्या दिवशी ते बोलत होते. दरम्यान या उपोषणास विविध पक्ष संघटनांच्या कडून वाढता पाठींबा मिळत आहे.
यावेळी बोलताना नारकर पुढे म्हणाले, पाटण तालुक्याच्या जनतेच्या विकासात भर घालणाऱ्या कराड- चिपळूण महामार्गाच्या कामाची सबंधित कंपनीकडून अक्षरशः वाट लागली आहे. कोट्यवधी रुपयांचे बील अदा होऊनही एल. अँड टी कंपनीने काम अर्धवट सोडून पळ काढला आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. कंपनीने सुमारे २११ कोटी रुपये घेऊनही अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. केलेल्या निकृष्ट दर्जाचे कामामुळे अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागले.सध्या कंपनीकडून थातूर मातूर दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. फक्त दिखावापणा न करता ठोस व टिकाऊ दर्जाचे काम झाले पाहिजे.
मात्र रस्त्याच्या निकृष्ट कामास जबाबदार शासकीय तसेच कंपनीचे अधिकारी यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत व एल अँड टी कंपनीवर कारवाई करून कंपनीने घेतलेले अतिरिक्त बील परत घ्यावे व कंपनीला काळ्या यादीत टाकावे शासकीय अधिकारी व कंपनीच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, या मागण्यांवर आजही ठाम असून जो पर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत, हे अमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
यावेळी मनसेचे शहराध्यक्ष चंद्रकांत बामणे, कोयना विभाग अध्यक्ष दयानंद नलवडे, संजय सत्रे, राम माने, हणमंत पवार, दीपक मुळगावकर, संभाजी चव्हाण, समर्थ चव्हाण, अधिक पाटील यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते.
मंत्रीमहोद्यांना विसर पडला आहे का?
तालुक्याचे सुपुत्र मंत्रीमहोदय आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात एकीकडे मग्न होते, तर दुसरीकडे आपल्याच मतदार संघातील निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात तालुक्यातील मनसैनिक तहसिलदार कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. याचा विसर मंत्रीमहोद्यांना पडला आहे का? अशी चर्चा उपोषण स्थळी सुरू होती.