मसूर ; जि.प.प्राथमिक शाळा, कोणेगावच्या उपशिक्षिका प्रमिला तरंगे यांनी इयत्ता-चौथीच्या वर्गासाठी राबवलेल्या ‘घरोघरी शाळा’ या उपक्रमाचे उद्घाटन सरपंच रमेश चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे मार्गदर्शक सदस्य राजकुमार चव्हाण व मुख्याध्यापक गोरख गिरी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राजकुमार चव्हाण यांनी “घरोघरी शाळा” या उपक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या, शाळेच्या प्रगतीबद्दल कौतुक केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी कोरोना काळात राबवलेल्या आॕनलाइन, आॕफलाइन वर्ग अध्यापन, आॕडिओ कथामालिका, रविवार माझ्या आवडीचा आणि घरोघरी शाळा या वर्ग उपक्रमांबद्दल व विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या आणि पटाच्या चढत्या आलेखाबद्दल समाधान व्यक्त केले.
कल्याणी मराठी हायस्कूलच्या सहशिक्षिका विजया भोपते, सरपंच रमेश चव्हाण, पालक रोहिणी बाईंग यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी उपसरपंच संदीप चव्हाण,समाधान चव्हाण, प्रदीप शेलार, सुभाष बाईंग, जि.प.प्राथमिक शाळा कोणेगावचा शिक्षकवृंद व विद्यार्थी,पालक उपस्थित होते. प्रास्तविक उपशिक्षिका प्रमिला तरंगे यांनी केले. स्वागत वसंत शेडे यांनी केले तर कृष्णत हिरवळे यांनी आभार मानले.