खा.श्रीनिवास पाटील यांनी केली लोकसभेत मागणी
कराड : सातारा-पुणे महामार्गाची अवस्था अत्यंत खराब असून महामार्गाचा दर्जा सुधारण्यासह अपघाताची ठिकाणे हटवावेत, पर्यायी बोगद्याच्या कामाला गती द्यावी, मार्गावरील पथे दिवे सुरू करावेत, पारगाव येथील पूलाला मंजूरी द्यावी यासह अन्य मागण्या खा.श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केल्या.
खा.श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत नियम 377 नुसार अतिमहत्त्वाचे व लेकहिताच्या विषयांसाठी सातारा लोकसभा मतदारसंघातील वरील मुद्दे सदनाच्या पटलावर ठेवले. यानुसार खा.पाटील यांनी म्हटले आहे, रस्ते व परिवहन मंत्री ना.नितीन गडकरी यांनी सातारा लोकसभा मतदारसंघात येऊन शेंद्रे ते कागल मार्गासाठी सुमारे 5 हजार कोटीच्या सहा पदरीकरण कामाचे भूमिपूजन केले होते. त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे आभार मानतो. मात्र यानिमित्ताने मला या राष्ट्रीय महामार्ग एनएच 48 संदर्भात सद्यस्थिती अवगत करावीशी वाटते की, सातारा ते पुणे महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. ज्या ठिकाणी काम पूर्ण झाले आहे त्याठिकाणी जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे महामार्गावर अनेकदा अपघाताचे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे पडलेल्या खड्ड्यांची दुरूस्ती करून काम गुणवत्तापूर्ण करावे. तसेच वेळे जवळ खंबाटकी घाटाला पर्यायी मार्गावर बांधण्यात येणाऱ्या दोन्ही बोगद्यांचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यास गती देऊन लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची गरज आहे. शिरवळ फाटा, खंडाळा फाटा, नागेवाडी, लिंबखिंड, म्हसवे, अजंठा चौक, शिवराज पंप, कोडोली, देगाव, भरतगाव, वळसे या ठिकाणी अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्या ठिकाणी सतत होणारे अपघात रोखण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली गेली पाहिजे.
पुणे ते सातारा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी तात्काळ सूचना संबधीत विभागाला देण्यात याव्यात. दरम्यान अधूनमधून रस्त्याच्या डागडुजीचे काम केले जाते, मात्र काही दिवसांनी त्याच ठिकाणी पुन्हा रस्ता उखडल्याने तो खराब होतो. त्यामुळे रस्ते दुरुस्तीचे काम हे दर्जेदार झाले पाहिजे. तशा सूचना ना.नितीन गडकरी यांनी संबंधितांना कराव्यात अशी विनंती त्यांनी केली आहे.
राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेले पथदिवे रात्रीच्या वेळी बंद अवस्थेत असतात. त्यामुळे रात्रीच्या सुमारास चौकाच्या ठिकाणी आणि जेथे महामार्गाला राज्यमार्ग जोडला जातो त्याठिकाणी अपघातांच्या घटना घडत आहेत. सातारा शहराजवळ बांधण्यात आलेल्या उड्डाणपूलावर रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. तेथे रस्त्याची लेवल नसल्याने ती दुरुस्त करणे आवश्यक आहे. सदरचे कामही लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे आहे. पारगाव (ता.खंडाळा) येथे नवीन फ्लायओव्हर बांधण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. या मागणीचा विचार करून सदर पूलाला तात्काळ मंजूरी द्यावी. अशा विविध मागण्या खा.पाटील यांनी केल्या आहेत.