यात्रा नियोजन कागदावरच; प्रवाशांची गैरसोय
दहिवडी : ता.३०
शिंगणापूर येथील वार्षिक यात्रा सुरू असून भाविकांच्या वाहतूक व्यवस्थेबाबत एसटी प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. यात्रेबाबत एसटी विभागाने केलेले नियोजन केवळ कागदावरच असून दहिवडी, म्हसवड मार्गावरील भाविकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रशासन यंत्रणा एसटी च्या नियोजनशून्य कारभाराकडे गांभीर्याने लक्ष देणार का असा प्रश्न भाविक, प्रवासी वर्गातून विचारला जात आहे.
दरवर्षी शिंगणापूर यात्रेपूर्वी नियोजन बैठक घेऊन सर्व विभागांचा आढावा घेतला जातो. यावर्षी झालेल्या यात्रा बैठकीतही शिंगणापूर यात्रेसाठी एसटीच्या सातारा विभागामार्फत 84 जादा बसेसचे नियोजन केल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र शिंगणापूर यात्रेत गुढीपाडवा ते पौर्णिमा कालावधीत लाखो भाविकांची गर्दी असते. परंतु एसटीचा सातारा विभाग केवळ शेवटच्या दोनच दिवस यात्रा कालावधी गृहीत धरून जादा वाहतुकीचे नियोजन करत असतो. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून शिंगणापूरमध्ये भाविकांची गर्दी असतानाही सातारा विभाग तसेच दहिवडी आगार प्रवासी सेवेबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. यात्रेसाठी 84 जादा बसेस धावणार असल्याचे सातारा विभागाने जाहीर केले असले तरी हे नियोजन केवळ कागदावरच असल्याचे चित्र आहे. अद्यापही शिंगणापूरहुन दहिवडी, म्हसवड, फलटण मार्गावर बसफेऱ्यांचा दुष्काळ जाणवत आहे. केवळ नियोजित वेळापत्रकाशिवाय जादा बसेस धावत नसल्याने दहिवडी, म्हसवड मार्गावरील प्रवाशांना तीन ते चार तास ताटकळत बसावे लागत असून एसटीच्या नियोजनशून्य कारभाराबाबत प्रवासी तसेच भाविकातून नाराजी व्यक्त होत आहे. यात्रा सुरू होऊन अजूनही शिंगणापूरमध्ये सातारा विभागाच्या आवश्यक प्रमाणात जादा बसेस, वाहतूक नियंत्रक, वाहतूक अधिकारी दाखल झाले नसल्याने ऐन यात्रा कालावधीत प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. त्यामुळे यापुढील कालावधीत तरी दहिवडी आगार प्रवाशांना सेवा देण्याबाबत तत्परता दाखवणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. याउलट सोलापूरसह, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, सांगली, नगर या बाहेरील विभागाच्या जादा बसेस शिंगणापूर-पंढरपूर मार्गावर जादा वाहतूक करून प्रवाशांना उत्तम सेवा देत असल्याचे चित्र आहे.