मुख्याधिकारी संजय गायकवाड व पोलीस निरीक्षक भारत केंद्रे यांचा कारवाईचा बडगा
फलटण : राज्यात कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत असताना, जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने पुन्हा एकदा फलटण शहरात विनामास्क वाहनचालकांवर शहर पोलीस व नगरपालिका कर्मचारी यांनी दंडात्मक कारवाई सुरू केल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. फलटण शहरात गुरुवारपासून गजानन चौक , महात्मा फुले चौक, आंबेडकर चौक या परिसरात अचानक कारवाई करण्यास सुरुवात केल्याने वाहनधारकांची चांगलीच धावपळ उडाली होती. फलटण शहरातील वाहनचालकांवर विना मास्क प्रत्येकी दोनशे रुपये दंड आकारण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक केंद्रे म्हणाले, कोरोनाचा वाढता संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच गर्दीचे ठिकाणी बंद करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस प्रशासनाने दिलेल्या आहेत. विना मास्क फिरणाऱ्या लोकांवरती कारवाई करण्यात येणार असून प्रत्येकी दोनशे रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
पोलिसांनी व नगरपालिकेने आज सुरू केलेल्या या कारवाईमुळे फलटण शहरातील नागरिकांना व वाहनधारकांना चांगलाच धसका बसलेला आहे. या बरोबरच कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल धारक दुकानदार व नागरिकांवर कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक केंद्रे व नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र न्यूज बरोबर बोलताना स्पष्ट केले.