महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :मराठा बिझनेस असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा सातारा यांच्यावतीने कराड येथे आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा मार्गदर्शन मेळावा नुकताच संपन्न झाला.
मेळाव्यास महामंडळाचे सातारा जिल्ह्याचे समन्वयक राहुल यादव, सांगली जिल्हा समन्वयक अनिल पाटील तसेच दि कराड अर्बन को-ऑप बँकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर अतुल शिंदे (मेहेरबान) उपस्थित होते.
प्रथमत: मराठा बिझनेस असोसिएशनच्यावतीने दिपक शेडगे यांनी MBA काय आहे आणि त्याचा हेतू काय आहे, हि संघटना कशी काम करते, याबद्दल उपस्थित बांधवाना माहिती दिली. त्यानंतर आलेल्या सर्व बंधू भगिनींचा व त्यांच्या व्यवसायाचा परिचय घेण्यात आला.

सातारा जिल्ह्याचे महामंडळाचे समन्वयक श्री राहुल यादव यांनी महामंडळाच्या योजने विषयी सविस्तर माहिती दिली व कर्ज प्रक्रिया कशी होते, महामंडळाचे या सर्व प्रक्रियेत काय सहभाग असतो, बँकांशी समन्वय कसा साधावा, याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले व तसेच महामंडळाचे कर्ज प्रकरण होत नाही हा गैरसमज मराठा समाजातील तरुणांनी काढून टाकावा, कारण या योजनेतून सातारा जिल्ह्यामध्ये २७०० पेक्षा जास्त लाभार्थी आहेत, आणि त्यातच सर्वात जास्त लाभार्थी हे कराड तालुक्यातील असल्याचे सांगितले. तसेच जे उमेदवार विहीत नमुन्यातील प्रस्ताव व योग्य कागदपत्रांची पुर्तता करतील त्यांचे कर्ज प्रकरण नाकारले जात नसल्याचे यावेळी आवर्जून सांगण्यात आले, तसेच याबाबतीत कोणास काही अडचण आल्यास सर्वतोपरी मदत करण्याची हमी त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली.
कराड अर्बन बँकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर श्री अतुल शिंदे यांनी महामंडळाच्या योजनेमध्ये बॅंकेच्या भूमिकेची माहिती दिली व जास्तीत जास्त मराठा उद्योजकांना बॅंकेमार्फत सहकार्य केले असल्याचे सांगितले आणि त्यांनीही नवीन व्यवसाय सुरु करणाराने महामंडळाच्या या कर्ज योजनेचा लाभ अवश्य घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली, तसेच बँकेच्या वतीने महामंडळाच्या योजनांना, तरुण उद्योजकांना बँकेचे पुरेपूर सहकार्य राहील अशी ग्वाही यावेळी दिली.
त्यानंतर ऋषिकेश जाधव यांनी आर्थिक साक्षरता, सिबील स्कोर, आयटी रिटर्न्स, इन्शुरन्सबद्दल माहिती उपस्थितांना दिली. ज्यांना काही शंका होत्या त्यांचे निरसन करण्यात आले.दरम्यान महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी कराडचे दिपक शेडगे, उमाकांत पवार, उमेश धुमाळ, ऋषिकेश जाधव, पाटणचे आप्पासाहेब देसाई, जावळीचे आकाश शिर्के, साताराचे किरण फाळके यांचेसह मराठा बिझनेस असोसिएशनचे संगठक व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















