दहिवडी : माण तालुक्यातील म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील पर्यंती येथे माय लेकीचा रात्रीच्या सुमारास दोरीने गळा आवळून खून झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळावरून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, पर्यंत ती ग्रामपंचायत शेजारी असणाऱ्या (संपताबाई लक्ष्मण नरळे वय-७५) आणि नंदूबाई भिकू आटपाडकर(वय-५८) यांचे गावात ग्रामपंचायत शेजारी छोटे किराणा दुकानातून त्या शेजारी असणाऱ्या खोलीत त्या वास्तव्यास होत्या. संपताबाई आणि नंदू बाई आटपाडकर या दोघेही विधवा असून संपताबाई यांना तीन मुली आणि दोन मुले आहेत, तर नंदूबाई आटपाडकर यांना दोन सावत्र मुले आहेत. बुधवारची रात्र उजाडल्यानंतर सकाळी संपताबाई यांची नात ही आजीला हाक मारत अली असता खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यावेळी तिला संपताबाई यांच्या राहत्या खोलीशेजारीच असलेल्या किराणा दुकानाचे शटर थोडेसे उघडे दिसले. त्यातून तिने डोकावून पाहिले असता तिची आजी आणि आत्या या दोघेही मृतावस्थेत असल्याच्या आढळून आल्याने तिने आरडाओरडा केला. त्यामुळे तिच्या घरचे धावत येऊन त्यांनी सदर घटना पाहिली. याबाबत तिच्या घरच्यांनी पोलीस पाटील यांना याबाबत माहिती दिली.
त्यानंतर पोलीस पाटलांनी म्हसवड पोलीस ठाण्यात याबाबतची खबर दिल्यानंतर म्हसवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचेही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथक, फॉरेन्सिक लॅबची टीम यावेळी उपस्थित होती. खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून या खूनाचा पोलीस शोध घेत आहेत.